Air India : एअर इंडियाची एकाच दिवसात पुन्हा 8 उड्डाणे रद्द; कारण काय?
(Air India ) एअर इंडियाची एकाच दिवसात पुन्हा 8 उड्डाणे रद्द करण्यात आली. एअर इंडियाने देखभाल आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे शुक्रवारी विमानांची आठ उड्डाणे रद्द केल्याची माहिती मिळत आहे. प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे तसेच उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तिकिटाचा पूर्ण परतावाही देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
या उड्डाणांमध्ये दुबईहून चेन्नईकडे येणारे एआय 906, दिल्लीहून मेलबर्नला जाणारे एआय 308, मेलबर्नहून दिल्लीला येणारे एआय 309, दुबईहून हैदराबादला जाणारे एआय 2204 या विमानांचाही समावेश आहे.
रद्द केलेल्या उड्डाणांमध्ये तीन आंतरराष्ट्रीय आणि पाच देशांतर्गत उड्डाणे आहेत. देशांतर्गत मार्गावर पुण्याहून दिल्लीला जाणारे एआय 874, अहमदाबादहून दिल्लीला रवाना होणारे एआय 456, हैदराबादहून मुंबईकडे येणारे एआय 2872 व चेन्नईकडून मुंबईला जाणारे एआय 571 या विमानांचा समावेश आहे. यातच एअर इंडियाने पुढील काही आठवड्यांसाठी मोठ्या विमानांच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात केली असल्याची घोषणा केली.