China Floods : बीजिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 34 जणांचा मृत्यू, हजारो लोकांचे स्थलांतर

China Floods : बीजिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 34 जणांचा मृत्यू, हजारो लोकांचे स्थलांतर

बीजिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 80,000 नागरिकांचे स्थलांतर
Published by :
Shamal Sawant
Published on

चीनची राजधानी बीजिंग आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीने थरकाप उडवला आहे. आतापर्यंत किमान 34 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळते. यात बीजिंगच्या मीयुन जिल्ह्यात 28, यानचिंगमध्ये 2 आणि हेबेई प्रांतात दरड कोसळून 4 जणांचा समावेश आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता असून शोधमोहीम सुरू आहे.

पूर्व आशियाई मान्सूनमुळे उत्तर चीनमध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. बीजिंगमध्ये केवळ 24 तासांत 448 मिमी इतका पाऊस झाला, जो वर्षभराच्या सरासरीइतका आहे. या अतिवृष्टीमुळे पूर, दरड कोसळणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. बीजिंगच्या 16 पैकी 10 जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने आपत्तीचा इशारा दिला आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, 80,000 हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मीयुन जिल्ह्यातील जलाशयात 1959 नंतरची सर्वाधिक पाणीसाठा नोंदवला गेला आहे. बॉओडिंग व हेबेई प्रांतातही पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशा अतिवृष्टीची शक्यता वाढली आहे. जुनी पूरनियंत्रण व्यवस्था यास पुरेशी ठरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अधिक पावसाचा अंदाज वर्तवला असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही आपत्ती चीनच्या कृषी अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम करू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com