दिल्लीत 27 वर्षांनी कमळ फुलणार?, केजरीवालांना मोठा धक्का ! निकालानुसार जनतेचा कौल भाजपला
देशामध्ये सध्या सर्वत्र दिल्ली निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 5 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. आज म्हणजे 8 फेब्रुवारी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळपासून मतदान मोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली विधानसभेचे 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले. यानुसार, भाजप आता 45, आप 25 तर कॉँग्रेस 2 जागांनी आघाडीवर आहे. यामध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसून येत आहे.
आकडेवारीनुसार भाजप सत्तेत येऊ शकतो असे भाकीत वर्तवले गेले होते. 27 वर्षांनी भाजप पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सत्ता करु शकते असे एक्झिट पोलमधूनही दिसून आले होते. दिल्लीमध्ये यश मिळावे यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्नदेखील करण्यात आले होते. आप पक्षाला धक्का बसावा यासाठी भाजपने दिल्ली येथील मद्य घोटाळ्याचे प्रकरणदेखील समोर आणले होते. या प्रकरणी 2024 साली अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवासदेखील भोगावा लागला होता. 2024 साली झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनादेखील तुरुंगवास भोगावा लागला. मात्र या दोघांनाही त्यांच्या राज्यामध्ये सहानुभूती मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत यश मिळाले.
आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप वरचढ ठरताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आपची जादूदेखील कमी होताना दिसत आहे. कॉँग्रेस पक्ष मात्र पूर्णतः पिछाडीवर असलेला दिसत आहे. जनतेचा कल नक्की कोणाला आहे? तसेच दिल्लीमध्ये कोणाचा गड राखला जाणार? याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.