Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जपानसोबत व्यापार कराराची घोषणा
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानसोबत ऐतिहासिक व्यापारी कराराची घोषणा केली आहे. हा करार आता “इतिहासातील सर्वात मोठा व्यापार करार” म्हणून ओळखला जात आहे.या करारानुसार, जपान अमेरिकेत तब्बल $550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून यामुळे लाखो रोजगार निर्माण होतील असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका आणि जपानमधील याआधीचा व्यापार तणाव या करारामुळे संपुष्टात आला आहे.
या कराराअंतर्गत, जपान अमेरिकन शेती उत्पादनं, तांदूळ, कार, ट्रक यांच्यासाठी आपली बाजारपेठ खुली करणार आहे. याबदल्यात, अमेरिकेनेही जपानी वस्तूंवर 15% प्रतिकारात्मक शुल्क लावण्याचे मान्य केले आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये अमेरिकेला 90% आर्थिक लाभ होणार असून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये नवीन युगाची सुरुवात झाली आहे.
गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये व्यापार धोरणांवरून मतभेद होते. विशेषतः अमेरिकन तांदूळ आणि कारसाठी जपानची मर्यादित मागणी ही एक मुख्य समस्या होती. मात्र जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा करार शक्य झाला.
अमेरिका-जपान कराराच्या पार्श्वभूमीवर आशियाई शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला. जपानच्या निक्केई225 निर्देशांकात 1,092 अंकांची जोरदार उसळी पाहायला मिळाली. भारत, हाँगकाँग, चीन आणि दक्षिण कोरियाचे बाजारसुद्धा सकाळी हिरव्या चिन्हात ट्रेड करत होते. या करारामुळे भारतासाठीही आशेचा किरण आहे. सध्या अमेरिका आणि भारत अनेक व्यापारविषयक प्रश्नांवर चर्चा करत आहेत. अशा ऐतिहासिक करारानंतर भविष्यात भारताशीही अमेरिका मोठा व्यापारी करार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.