Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा
(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून होत असलेल्या तेल खरेदीवर नाराजी व्यक्त करत मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी भारतातून होणाऱ्या सर्व आयातींवर एकूण 50 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशाद्वारे याबाबतची घोषणा केली. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि व्यापार कायद्यांचा हवाला दिला आहे. ट्रम्प यांच्या मते, भारताचे रशियाकडून होणारे तेल आयात अमेरिकेसाठी "गंभीर आणि असामान्य धोका" निर्माण करते. याआधीच लागू असलेल्या 25 टक्के टॅरिफवर आता आणखी 25 टक्के वाढ झाली असून हे नवीन शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
या निर्णयाचा परिणाम भारतीय निर्यातीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. विशेषतः ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, केमिकल आणि फार्मा क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी व्यापार अधिकारी अजय श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारत आता अमेरिका करीत सर्वाधिक शुल्क भरणारा देश ठरेल. यामुळे भारताची अमेरिका निर्यात 40-50 टक्क्यांनी घसरेल. त्यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेला "दुटप्पी" म्हटले आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भारत सरकारने हे शुल्क “अन्यायकारक, अनुचित आणि अकारण” असल्याचं ठामपणे म्हटलं आहे. तसेच देशाच्या व्यापारी हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या या टॅरिफ धोरणामुळे भारत-अमेरिका व्यापारात तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, जागतिक पुरवठा साखळीवरही याचा परिणाम होऊ शकतो.