H-1B Visa : 'अमेरिकेत जाणे महागणार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा धारकांना मोठा धक्का
थोडक्यात
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा धारकांना मोठा धक्का
एच1-B व्हिसा अर्ज शुल्क एक लाख डॉलर्सपर्यंत वाढवले
या निर्णयाचा अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कामगारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता
(H-1B Visa) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले असून H-1B व्हिसा धारकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचा अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कामगारांवर मोठा परिणाम होऊ शकतो
H-1B व्हिसा हा परदेशी कुशल कामगारांना अमेरिकेत नोकरी करण्यासाठी मिळणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. याच व्हिसाच्या आधारावर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने अमेरिकेत जाऊन रोजगार मिळवतात. मात्र, नव्या नियमांनुसार आता अर्ज करणाऱ्यांना तब्बल $100,000 म्हणजेच सुमारे 88 लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
विशेष म्हणजे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना हे शुल्क परवडणारे ठरेल, पण लघु व मध्यम उद्योगांसाठी मात्र हे मोठे आव्हान ठरणार आहे. यामुळे अशा कंपन्या परदेशी कामगारांना नोकरी न देता स्थानिक अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सरकारचे म्हणणे आहे की, या व्हिसाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्यानेच कडक अटी घालाव्या लागल्या. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बदलामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. भारतीय व्यावसायिक आणि आयटी क्षेत्रासाठी H-1B व्हिसा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या निर्णयामुळे अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठे अडथळे उभे राहणार आहेत.