Donald Trump : '50 दिवसांत युद्ध थांबवा, अन्यथा...'; डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी?
(Donald Trump ) डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी एक नवीन आणि आक्रमक धोरण जाहीर केले आहे. त्यांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, रशियाने 50 दिवसांत शांतता करार न केल्यास त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे.
ओव्हल ऑफिसमधून केलेल्या या घोषणेमध्ये ट्रम्प यांनी युरोपीय देशांनी अमेरिकन बनावटीची शस्त्रे विकत घेऊन ती युक्रेनकडे पाठवावीत, अशी योजना समोर ठेवली. यातून अमेरिकेची थेट भूमिका कमी भासेल आणि युरोपची जबाबदारी वाढेल, असाही हेतू आहे. या संदर्भात NATO महासचिव मार्क रुटे यांच्यासोबत बैठकही पार पडली.
ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, जर रशियाने ठरलेल्या मुदतीत युद्ध थांबवले नाही, तर अमेरिका 100% पर्यंत टॅरिफ लावणार आहे. याला ‘सेकंडरी टॅरिफ’ म्हणतात. म्हणजेच रशियन तेल खरेदी करणाऱ्या इतर देशांवरही आर्थिक दडपण टाकले जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट रशियाला धमकीवजा इशारा दिला आहे. जर व्लादिमीर पुतिन यांनी पुढील 50 दिवसांत युक्रेनबरोबरील युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली नाही तर रशियाविरुद्ध कठोर टॅरिफ लागू करण्यात येईल.
पुतिन यांच्याबद्दल ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "मी अनेकदा कराराच्या जवळ गेलो, पण रशियाने वेळकाढूपणा केला." पूर्वी पुतिन यांच्यावर सकारात्मक बोलणारे ट्रम्प आता त्यांच्यावर तीव्र टीका करताना दिसत आहेत.
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याशी झालेली चर्चा सकारात्मक झाली असल्याचे सांगितले. त्यांनी अमेरिका, जर्मनी आणि नॉर्वेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, पॅट्रिओट क्षेपणास्त्र प्रणालीसह इतर संरक्षण सामग्री युक्रेनला मिळणार असल्याचे स्पष्ट केले. युरोपीय देशांमध्ये जर्मनी, फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वे यांचा समावेश असून ते शस्त्रास्त्र पुरवठ्यात सहभागी होणार आहेत. या शस्त्रास्त्रांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली, शॉर्ट रेंज मिसाइल्स आणि हॉविट्झर सारख्या तोफा यांचा समावेश असेल.