Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी पोलिसांचा ताबा घेण्याची केली घोषणा
(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसी मेट्रोपॉलिटन पोलीस विभाग थेट संघीय नियंत्रणाखाली आणत शहरात शेकडो नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. "आज डीसीसाठी स्वातंत्र्य दिन आहे. आम्ही आमचं राजधानीचं शहर परत घेणार आहोत," असे वक्तव्य करत त्यांनी याला ‘कायद्याची आणि सुव्यवस्थेची पुनर्स्थापना’ म्हणून संबोधले.
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी एकामागून एक धाडसी निर्णय घेतले आहेत. यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई, परदेशी आयातीवर टॅरिफ लागू करणे यांसारख्या उपायांचा समावेश आहे. आता वॉशिंग्टन डीसीसाठी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अमेरिकेतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा रंगली आहे.
ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या कारवाईनुसार, नॅशनल गार्डला कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि निर्बंधांशिवाय काम करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की या मागे प्रमुख उद्देश म्हणजे शहरातील वाढत्या हिंसक गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे आणि सार्वजनिक सुरक्षेची हमी देणे.
ही कारवाई "डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया होम रूल अॅक्ट" अंतर्गत होत असून, त्यामुळे स्थानिक पोलिसांचे नियंत्रण थेट संघीय प्रशासनाकडे जाणार आहे. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, "वॉशिंग्टनमध्ये पुन्हा शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी हा आवश्यक निर्णय आहे."
या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी याच धर्तीवर लॉस एंजेलिसमध्येही नॅशनल गार्डची तैनाती केली होती, तेव्हा स्थानिक गव्हर्नरच्या विरोधाला न जुमानता संघीय एजन्सी सक्रिय करण्यात आल्या होत्या. वॉशिंग्टन डीसीतील ही पावले त्याच धर्तीवर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे