Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत - अमेरिका व्यापाराबद्दल मोठे विधान, म्हणाले...
थोडक्यात
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत - अमेरिका व्यापाराबद्दल मोठे विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबतचा सूर बदलला
‘पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्यास मी उत्सुक’
( Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताबाबतचा सूर बदललेला दिसतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी भारतावर आयातशुल्क वाढवून दबाव आणला होता, तसेच त्यांच्या प्रशासनाकडून भारताविरोधात सतत टीकात्मक विधानं होत होती. मात्र आता ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत भारत-अमेरिका व्यापार चर्चा पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत आणि पुढील आठवड्यात त्यांच्यासोबत बोलण्याची उत्सुकता आहे. तसेच, दोन्ही देशांमधील व्यापारी अडथळे दूर करण्यासाठी चर्चा पुन्हा सुरू होईल, असा त्यांचा विश्वास आहे. यापूर्वीही त्यांनी मोदींशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला होता, पण यावेळी थेट चर्चेचा संकेत दिला आहे.
भारतावर लादलेल्या अतिरिक्त आयातशुल्कामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. हे शुल्क रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीमुळे लादण्यात आले होते. मात्र आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसतो आहे. पंतप्रधान मोदी यांनीही ट्रम्प यांच्या टिप्पणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यामुळे चर्चेची नवी दारे उघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी भारताबाबत आपली भूमिका थोडी मवाळ केली. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये नवा टप्पा सुरू होऊ शकतो, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.