Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
थोडक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत
मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा
ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध, तेलाचे दर आणि भारताशी असलेले संबंध यावर भाष्य केले
(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध, तेलाचे दर आणि भारताशी असलेले संबंध यावर भाष्य केले.
ट्रम्प म्हणाले की, त्यांनी अमेरिकेचा कारभार दुसऱ्यांदा सांभाळायला सुरुवात केल्यापासून जगातील अनेक युद्धे आटोक्यात आणली आहेत. मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना निराश केले. त्यांच्या मते, जर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, तर पुतिन यांच्यावर युद्ध थांबवण्याचा दबाव येईल. पण युरोपीय देश रशियाकडून तेल खरेदी करत राहिले, तर परिस्थितीत सुधारणा होणार नाही.
भारताबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा आहे. नुकतेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्यात उत्तम संबंध आहेत, पण तरीही मी भारतावर निर्बंध घातले.” ट्रम्प यांनी यासोबतच भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेयही स्वतःकडे घेतले. त्यांनी दावा केला की, दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरू राहावा यासाठी त्यांनी दबाव आणला आणि त्यामुळे संघर्ष कमी झाला.
भारताने ट्रम्प यांच्या या दाव्याला वारंवार नकार दिला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानशी झालेला शस्त्रविराम हा फक्त दोन्ही देशांच्या सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील थेट चर्चेचा परिणाम होता, यामध्ये कोणताही हस्तक्षेप नव्हता.