Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर
(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ला अमेरिकन सिनेटमध्ये मंजुरी मिळाल्याने त्यांना मोठा राजकीय विजय मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले हे विधेयक गुरुवारी हाऊस ऑफ रिप्रजेंटेटिव्हमध्ये 218-214 मतांनी मंजूर झाले. याआधी सिनेटमध्येही ते 51-50 अशा अल्प फरकाने संमत झाले होते. उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी निर्णायक मत नोंदवले.
हे विधेयक करकपात कायम ठेवण्याबरोबरच, नवीन करसवलतींचा यामध्ये समावेश आहे आणि काही फेडरल योजनांमध्ये कपात करण्यात येणार आहे. विशेषतः मेडिकेडवरील खर्च कमी होणार असून, या विधेयकामुळे आगामी 20 वर्षांत 4.5 ट्रिलियन डॉलर्सचा कर महसूल कमी होणार आहे. फेडरल खर्चात 1.1 ट्रिलियन डॉलर्सची कपात होणार असल्याचे काँग्रेसनल बजेट ऑफिसने म्हटले आहे.
रिपब्लिकन पक्षात आर्थिक परिणामांबाबत चिंता असूनही, फक्त दोन खासदारांनी याला विरोध केला. डेमोक्रॅट्सने मात्र एकमुखी विरोध दर्शवत हा कायदा श्रीमंतांना लाभदायक ठरेल आणि सामान्य लोकांचे आरोग्यसेवेवरील हक्क कमी होतील, अशी टीका केली.
हे विधेयक ट्रम्प यांच्या धोरणांचा केंद्रबिंदू असून, निवडणुकीतील अनेक आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.