Donald Trump
Donald Trump

Donald Trump : व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

अलास्कातील अँकरिज शहरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात तीन तासांहून अधिक काळ क्लोज-डोअर बैठक झाली.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Donald Trump) अलास्कातील अँकरिज शहरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात तीन तासांहून अधिक काळ क्लोज-डोअर बैठक झाली. या बहुप्रतीक्षित बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी वातावरणात आशावाद दिसून आला तरी त्यात सावधगिरीचा सूरही होता.

पत्रकार परिषदेत पुतिन यांनी पहिले बोलणे सुरू केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आधी बोलतात. मात्र पुतिन यांनी अमेरिकन-रशियन संबंधांची अधोगती अधोरेखित केली आणि ती “शीतयुद्धानंतरच्या सर्वात खालच्या टप्प्यावर” पोहोचली असल्याचे सांगितले. संघर्षाऐवजी संवादाची गरज असल्याचे अधोरेखित करताना त्यांनी म्हटले, “कधीतरी ही परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे. ही बैठक खूप उशिराने झाली आहे.”

पुतिन यांनी स्पष्ट केले की “युक्रेन आणि युरोपीय देश शांततेच्या प्रक्रियेत अडथळा आणणार नाहीत अशी अपेक्षा आहे.” त्यांनी ट्रम्प यांच्या “सद्भावनापूर्ण दृष्टिकोनाबद्दल” आभार मानले आणि दोन्ही देशांनी ठोस परिणाम साधण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज मांडली. “ट्रम्प आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत, पण त्यांना रशियाच्या हितसंबंधांचीही जाणीव आहे,” असे पुतिन म्हणाले.

ट्रम्प म्हणाले, “बैठक अत्यंत फलदायी झाली असून अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे, काही मोठे मुद्दे असे आहेत जिथे आपण अजून पूर्णपणे पोहोचलो नाही, पण प्रगती झाली आहे,” असे त्यांनी नमूद केले. या उच्चस्तरीय बैठकीत अंतिम करार झाला नसला तरी दोन्ही नेत्यांनी प्रगती आणि संवादाच्या सातत्याची गरज अधोरेखित केली. विशेषतः युक्रेन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य व समन्वय आवश्यक आहे, हे स्पष्ट झाले.

बैठकीच्या अखेरीस पुतिन यांनी इंग्रजीत थेट संदेश दिला, “Next time in Moscow.” त्यांच्या या विधानाने भविष्यातील चर्चेसाठी दार खुले झाले आणि पुढची बैठक रशियात होण्याची शक्यता निर्माण झाली. अलास्कातील चर्चा पुतिनसाठी राजनैतिक विजय मानली जात असून त्यांनी पश्चिमेकडून झालेल्या अलिप्ततेला प्रत्युत्तर दिल्याचा संदेश दिला.ट्रम्प यांच्यासाठी ही बैठक युक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. झेलेन्स्की यांना सामील करून व्यापक चर्चेचा मार्ग खुला झाल्याचे स्पष्ट झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com