Coffee : काल्दीच्या मेंढ्यांपासून ते कर्नाटकातील बाबाबुदन गिरीपर्यंत, कॉफीचा इतिहास सविस्तरपणे...
इतिहासात काही पेये अशी आहेत, जी केवळ स्वादापुरती मर्यादित राहत नाहीत. संस्कृती, धर्म, राजकारण, आणि अर्थव्यवस्थेच्या गाभ्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. यापैकी अशाच एका चवदार, सुगंधित आणि ऊर्जादायक पेयाचे नाव म्हणजे 'कॉफी'. आज जगभरात अब्जावधी लोकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीच्या एका गरम प्यालाने होते. पण या ऊर्जादायक कॉफीमागे लपलेली कहाणी किती जणांना माहिती आहे? चलातर कॉफीचा हा मनोरंजक इतिहास आज आपण जाणून घेऊया.
कॉफीचा उदय :
लोककथेनुसार, कॉफीचा उगम इथिओपियाच्या हिरव्या पर्वतरांगांमध्ये झाला आहे. काल्दी नावाचा एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या ऐकाएकी विचित्र वर्तनामुळे चकित झाला होता. त्या मेंढ्यांनी एका विशिष्ट झाडाची लालसर फळे खाल्ल्यानंतर अत्यंत उत्साही वागायला सुरुवात केली. काल्दीने ही फळे जवळच्या सूफी साधूंना दिली. त्यांनी त्यांचा काढा तयार केला आणि रात्रीच्या ध्यानधारणेत ती ऊर्जा त्यांना उपयुक्त ठरली. यथावकाश, ही ऊर्जा देणाऱ्या बिया म्हणजेच कॉफीचे पहिले ज्ञात रूप ठरले आहे.
15 व्या शतकात येमेनमध्ये कॉफीची लागवड सुरू झाली. येथील सूफी संत ध्यानधारणेच्या वेळेस जागरणासाठी कॉफीचा वापर करू लागले. कॉफीने धार्मिक आणि सामाजिक आयुष्यात स्थान मिळवले. येमेनमधील मोक्का बंदर हे कॉफी व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले, आणि 'मोक्का' ही संज्ञा आजही कॉफीच्या एका प्रकारासाठी वापरली जाते. 16व्या-17 व्या शतकात कॉफीने तुर्कस्थान, इजिप्त आणि इटलीमार्फत युरोपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कॉफीने लवकरच लंडन, व्हिएन्ना, पॅरिस आणि व्हेनिसमध्ये कॉफी हाऊसेस उघडायला सुरुवात झाली. जिथे तत्त्वज्ञ, साहित्यिक, राजकारणी आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन चर्चा करत असत.
भारतामध्ये कॉफीचा शिरकाव 1670 साली झाला. बाबा बुदन नावाचे एक सूफी साधू हज यात्रेवरून येताना येमेनमधून कॉफीच्या सात बिया भारतात आणल्या आणि कर्नाटकातील चिकमंगलूर येथे लावल्या असे संदर्भात आढळून येते.आजही त्या परिसरातील पर्वतरांगांना ‘बाबा बुदन गिरी’ म्हणून ओळखले जाते. ही कॉफी भारतातल्या कॉफी उद्योगाचा पाया ठरली.
कॉफीचे साम्राज्य :
19 व्या शतकात युरोपियन वसाहतवाद्यांनी कॉफीची लागवड आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आशियात केली. ब्राझील, कोलंबिया, व्हिएतनाम आणि भारत हे जगातील प्रमुख कॉफी उत्पादक देश बनले.आज कॉफी अनेक रुपांत दिसते. एस्प्रेसो, लाटे, कॅपेचिनो, फिल्टर कॉफी, कोल्ड ब्रू, आणि बरेच काही. प्रत्येक देशाची स्वतःची शैली आहे. भारतात दक्षिणेकडील फिल्टर कॉफी एक वेगळी चव आणि सांस्कृतिक ओळख जपते. हल्ली कॉफी म्हणजे केवळ पेय नव्हे तर जीवनशैलीचा अविभाज्य भाग ठरत आहे. कॉफी फक्त एक ऊर्जा देणारे पेय नाही, तर ती एक संवादाची सुरुवात आहे. ती साहित्यिकांना प्रेरणा देते, विचारवंतांना बौद्धिक उर्जा देते आणि सामान्य माणसाच्या दिवसाची गोड सुरुवात करणारी ठरते.