जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट, ही भेट स्वतःजवळही ठेवू शकणार नाही, कारण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा जेव्हा जगभरातील मोठे नेते भेटायला येतात तेव्हा ते त्यांना भेटवस्तू देतात. मोदींकडून दिली जाणारी ही खास भेट सर्वच नेत्यांना त्यांच्या जवळ आणते. मोदींच्या या भेट वस्तू देण्याच्या सवयीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणजेच राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पत्नी जिल यांना एक हिरा गिफ्ट दिला होता. हा हिरा 2023 मधील सर्वात महागडे गिफ्ट ठरले आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. हा हिरा 7.5 कॅरेटचा असून त्याची किंमत जवळपास 17 लाख एवढी आहे.
पण जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन हा हिरा वैयक्तिकरित्या वापरू शकणार नाहीत. कारण कारण तो व्हाईटच्या ईस्ट विंगमध्ये अधिकृत वापरासाठी ठेवण्यात येणार आहे.
जिल बायडेन यांच्या प्रवक्त्याने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये पॉलिश करण्यात आलेला हा हिरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी २० जानेवारीला राष्ट्रीय अभिलेखागाराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
नियमांनुसार, बायडेन यांनी पद सोडल्यानंतर त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना पतीच्या कार्यकाळात मिळालेल्या भेटवस्तू अमेरिकन सरकारकडू खरेदी करण्याचा पर्याय असणार आहे. अमेरिकन कायद्यानुसार, फर्स्ट फॅमिलीला परदेशी अधिकाऱ्यांकडून ४८० अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक किमतींच्या भेटवस्तूंची माहिती सरकारला द्यावी लागते. पण यापेक्षा कमी किमतींच्या भेटवस्तू वैयक्तिक वापरासाठी फर्स्ट फॅमिली घेऊन जाऊ शकते. पण, महागड्या भेटवस् राष्ट्रीय अभिलेखागाराकडे हस्तांतरित केल्या जातात.