Filght Viral Video : "अल्ला हू अकबर...बॉम्बने उडवीन...", म्हणत प्रवाशाचा विमानात गोंधळ
लंडनहून ग्लासगोच्या दिशेने निघालेल्या इझीजेट एअरलाइनच्या विमानात एक गंभीर प्रकार घडला आहे. विमानाच्या उड्डाणादरम्यान एका प्रवाशाने अचानक प्रचंड गोंधळ घालायला सुरुवात केली. ‘मी हे विमान बॉम्बने उडवून देईन’, अशा प्रकारची धमकी देत त्याने ‘अल्लाह हू अकबर’, ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘ट्रम्प मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्याने इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात तो प्रवासी जोरजोरात ओरडताना आणि उभं राहून अशांतता निर्माण करताना दिसत आहे. घटनेनंतर विमानाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी घेतली गेली आणि विमान सुरक्षितपणे ग्लासगो विमानतळावर उतरवण्यात आले.
विमान खाली उतरल्यानंतर संबंधित 41 वर्षीय इसमाला त्वरित पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. स्कॉटलंड पोलिसांनी त्याला अटक केली असून, या प्रकरणाची चौकशी आता दहशतवादविरोधी पथकाकडून केली जात आहे.
गोंधळ होऊनही विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही. ग्लासगो टाइम्सच्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही दुर्लक्ष झालेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या घटनेची पार्श्वभूमी पाहता, अमेरिकी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्कॉटलंड दौरा सुरू असून, युरोपियन युनियनसोबत झालेल्या महत्त्वाच्या कराराच्या पार्श्वभूमीवर त्यांना विरोध होत आहे.