Sahkar Taxi : Ola-Uber ची मक्तेदारी धोक्यात? सरकारची नवीन टॅक्सी सर्व्हिस सुरु होणार
सध्या देशभरात ओला, उबेर, इनड्राइव्ह असे अग्रीगेटर आहेत. मात्र आता याला पर्याय म्हणून सरकारने एक नवीन सुविधा सुरु केली आहे. याबद्दल केंद्र सरकारने नवीन घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नवीन कॉपरेटीव्ह टॅक्सी सर्व्हिस 'सहकार टॅक्सी' सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आधीच अस्तित्त्वात असणाऱ्या इतर टॅक्सी सेवांना आव्हान मिळणार आहे. याबद्दलची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
घोषणा करताना अमित शाह म्हणाले की, "लवकरच ओला आणि उबर सारखा सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येईल. ओला आणि उबरच्या धर्तीवर देशात सहकारी टॅक्सी सेवा चालवली जाईल. दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहन चालकांना या सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्मवर स्वतःची नोंदणी करता येईल. सहकारी आधारित टॅक्सी सेवेमध्ये बाईक, कार आणि रिक्षा नोंदणीकृत असतील. तसेच चालकांना त्यांच्या कमाईचा वाटा कोणालाही द्यावा लागणार नाही."