Indian Navy : भारतीय नौदलाच्या ताफ्यात मोठी भरती, 2035 पर्यंत 175 जहाजांचा लक्ष्य
भारतीय नौदलात लवकरच आणखी 17 युद्धनौका आणि 9 पाणबुड्या दाखल होणार असून, सध्या या प्रस्तावांना विविध मंजुरीच्या टप्प्यांमधून मार्ग मिळत आहे. सध्या 61 नौका आणि पाणबुड्यांचे बांधकाम सुरू असून, नव्या प्रस्तावित जहाजांचे उत्पादन भारतातच होणार आहे.
यामध्ये ‘प्रोजेक्ट 17 B’ अंतर्गत 7 आधुनिक फ्रिगेट्स आणि 2 बहुउद्देशीय नौकांसाठी ₹70,000 कोटी रुपयांचे प्रस्ताव लवकरच मागवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ‘प्रोजेक्ट 75-I’ अंतर्गत 6 अत्याधुनिक पाणबुड्या आणि ‘प्रोजेक्ट 75 अॅड-ऑन्स’ अंतर्गत 3 स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांची निर्मिती प्रस्तावित आहे. दोन्ही प्रकल्पांची एकत्रित किंमत सुमारे ₹1.06 लाख कोटी रुपये इतकी आहे.
याशिवाय, 8 नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्सच्या बांधकामासाठीही ₹36,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हे सर्व प्रकल्प मिळून ₹2.40 लाख कोटींहून अधिक खर्चाचे असतील. निवृत्त नौदल अधिकारी आणि संरक्षण विश्लेषक कमोडोर अनिल जय सिंह यांनी सांगितले की, नौदलाचे नियोजन धोके लक्षात घेऊन नव्हे, तर दीर्घकालीन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने केले जाते. जुन्या युद्धनौकांची जागा घेण्यासाठी आणि एकूण ताफ्यात वाढ करण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत.
भारतीय नौदलाकडे सध्या 130 पेक्षा अधिक युद्धनौका व पाणबुड्या आहेत. याउलट, चिनी नौदलाकडे 355 नौकांचा विशाल ताफा आहे. त्यामुळे सामरिक दृष्टीने भारतानेही आपल्या क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. पाणबुडी ताफा जुन्या नौकांनी भरलेला आहे. सध्या 12 जुनाट पाणबुड्या कार्यरत आहेत. त्यामुळे पाणबुडी युद्धक्षेत्रात भारताची ताकद मर्यादित आहे.
याशिवाय, डिस्ट्रॉयर वर्गातील नव्या प्रकल्पांची गरज अधोरेखित होत आहे. 25 वर्षांपूर्वी सेवेत दाखल झालेल्या ‘दिल्ली क्लास डिस्ट्रॉयर’साठी बदलाची योजना त्वरीत आखणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्या संख्येत घट होऊ शकते. भारतीय नौदलाने 2035 पर्यंत 175 जहाजांचा ताफा उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.