Global Peace Index 2025 : महायुद्धाचे सावट! जाणून घ्या जगातील सुरक्षित आणि असुरक्षित देश, भारत कितव्या क्रमांकावर ?
सध्या जगावर दुसऱ्या महायुद्धाचे सावट पसरले आहे. इराण-इस्रायल युद्ध मोठ्या प्रमाणात पेटले असून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्येही युद्ध सुरू आहे. अशातच ग्लोबल पीस इंडेक्स 2025 नुसार जग पूर्वीपेक्षा कमी शांत होत चालले आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेत घसरण सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत, जगातील 10 सर्वात सुरक्षित आणि 10 सर्वात असुरक्षित देश कोणते आहेत हे जाणून घ्या.
जगातील 10 सर्वात सुरक्षित देश
जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत आइसलँडने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. 2008 पासून या देशाने आपले स्थान कायम ठेवले आहे. आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे जगातील १० सर्वात सुरक्षित देशांपैकी 8 देश एकट्या युरोपमधील आहेत. त्याच वेळी, जगातील सर्वात मोठे भूभाग असलेला आशियातील फक्त एकच देश या यादीत आहे. टॉप 10 सुरक्षित देशांच्या यादीत आयर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे, न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.तसेच सिंगापूर हा एकमेव आशियाई देश आहे जो सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे पोर्तुगाल 7 व्या, डेन्मार्क 8 व्या, स्लोव्हेनिया 9 व्या आणि फिनलंड 10 व्या स्थानावर आहे.
जगातील 10 सर्वात असुरक्षित देश
ग्लोबल पीस इंडेक्स 2025 रँकिंगमध्ये रशियाला 163 देशांच्या यादीत तळाशी स्थान देण्यात आले आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात कमी सुरक्षित देश बनला आहे. त्यानंतर युक्रेनचा क्रमांक लागतो. सर्वात असुरक्षित देशांच्या यादीत सुदान तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर आफ्रिकेतील काँगो चौथ्या क्रमांकावर आहे. मध्य पूर्वेतील हिंसाचाराचा बळी असलेला येमेन पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वात असुरक्षित देशांमध्ये अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे, त्याचप्रमाणे सीरिया, दक्षिण सुदान, इस्रायल आणि माली अनुक्रमे सातव्या ते दहाव्या क्रमांकावर आहेत.
जाणून भारत आणि पाकिस्तान कितव्या क्रमांकावर आहेत
ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारत 115 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीही भारत याच क्रमांकावर होता. पाकिस्तानच्या क्रमवारीत एका अंकाने वाढ झाली आहे आणि यावेळी तो 144 व्या स्थानावर आहे.