Iran-Israel War : हजारो भारतीयांची होणार घरवापसी, इराणचे भारताला सहकार्य ; विशेष विमानं तैनात
इराण-इस्रायल युद्ध मोठ्या प्रमाणात पेटले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे डागली जात आहेत आणि त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, इराणमध्ये अडकलेल्या आपल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. या अंतर्गत, सर्व नागरिकांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान आता इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना लवकरच मायदेशी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी इराण भारताला पूर्ण सहकार्य करत आहे, ते त्यांच्या हवाई क्षेत्रावरील अनेक निर्बंध कमी करत आहे. त्याचप्रमाणे इराणमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना इराणच्याच तीन विशेष विमानांद्वारे दिल्लीला आणले जाईल अशी माहितीदेखील समोर आली आहे.
इराणहून पहिले विमान शुक्रवारी आज रात्री निघणार आहे, पुढील दोन विमाने शनिवारी दुपारपर्यंत दिल्लीला पोहोचतील. तसेच इराणच्या मते, गरज पडल्यास आणखी विमाने भारतात पाठवली जातील. सध्या इराणमधील सर्व भारतीय पूर्णपणे सुरक्षित आहेत यावर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत या आठवड्यात 110 भारतीयांना इराणमधून सुरक्षितरित्या भारतात आणले गेले आहे.
'ऑपरेशन सिंधु' अंतर्गत भारतीयांना बाहेर काढण्यात आले होते. इराण तसेच इस्रायलमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असल्याने, तेथूनही सर्व भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे सांगितले जात आहे की हवाई क्षेत्रावर अनेक निर्बंध आहेत, अशा परिस्थितीत इस्रायलमधून जमिनीच्या सीमेवरून लोकांना वाचवता येते.