Iran : इराणने देशाबाहेर काढले 5 लाखांहून अधिक अफगाणी नागरिक; नेमकं कारण काय?
(Iran) इराणने इस्रायलविरोधात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात घुसलेल्या विदेशी नागरिकांविरोधात कठोर पावले उचलली असून, त्यामध्ये प्रामुख्याने अफगाणी नागरिकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) माहितीनुसार, 24 जून ते 9 जुलै 2025 या कालावधीत तब्बल 5 लाख 8 हजार 426 अफगाणी नागरिकांना इराणमधून त्यांच्या मायदेशात पाठवण्यात आलं.
तालिबानने 2021 मध्ये अफगाणिस्तानात सत्ता घेतल्यानंतर लाखो नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला होता. इराणमध्ये स्थायिक झालेल्या अनेक अफगाणी नागरिकांनी स्थानिक मजुरी, कामगार क्षेत्रात अत्यंत कमी पगारावर काम सुरू ठेवलं होतं. मात्र, मार्च 2025 मध्ये इराणी सरकारने अफगाण निर्वासितांना देश सोडण्यासाठी 6 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर सरकारने देशभरात मोहीम राबवून निर्वासितांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली.
या मोहिमेमागील प्रमुख कारणांमध्ये सुरक्षेचा धोका, इस्रायलसाठी हेरगिरीचे आरोप, बेकायदेशीर वास्तव्य, वाढती महागाई आणि देशांतर्गत अस्थिरता हे मुद्दे अधोरेखित झाले आहेत. इराण सरकारचा दावा आहे की, अनेक अफगाणी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत होते, तसेच काहींचे इस्रायलशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
इराणच्या अधिकृत माध्यमांनी काही अफगाणी नागरिकांचे कबुलीजबाब दाखवले, ज्यामध्ये त्यांनी परकीय गुप्तचर संस्थांशी संपर्कात असल्याचे मान्य केल्याचे सांगण्यात आलं. यामुळे देशातील अफगाण निर्वासितांकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आणि त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप लावले गेले. हद्दपारीच्या या प्रक्रियेमध्ये अनाथ मुलं, महिला, आणि ज्येष्ठ नागरिक यांचाही समावेश असून, अनेकांना अन्न, पाणी व सुरक्षिततेपासून वंचित राहावं लागत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातच 400 हून अधिक अनाथ मुलांना इराणमधून हाकलण्यात आलं. काही निर्वासितांनी माध्यमांना सांगितले की, त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली, त्यांचे पैसे हिसकावले गेले आणि कोणतीही सोय न करता जबरदस्तीने सीमेवर पोहोचवले गेले.
इराणच्या सीमांवरून अफगाणिस्तानमध्ये परतणाऱ्या लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत असून, त्यांच्यासोबत फक्त अंगावरचे कपडे आहेत. उष्णतेमुळे आणि अन्नपाण्याअभावी काहींना जीव गमवावा लागला आहे, असे रेड क्रेसेंटने नमूद केलं आहे.