Iran-Israel War : 'होर्मुझ’चा जलमार्ग बंद? भारतासह जगभरातील इंधन पुरवठ्याला मोठा फटका बसण्याची शक्यता
(Iran-Israel War ) इराण-इस्रायल संघर्षामध्ये वाढ होत असतानाच अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनी परिस्थिती अधिकच चिघळली आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने इराणच्या फोर्डो, इश्फाहान आणि नतान्झ येथील अणुकेंद्रांवर हल्ले केले. यानंतर इराणने प्रतिउत्तरात इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले आणि अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग होर्मुझ खाडी व्यापारासाठी बंद करण्याचा इशारा दिला.
इराणच्या संसदेनं या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली असून, अंतिम निर्णय आता राष्ट्रीय सर्वोच्च सुरक्षा समितीकडे आहे. ही खाडी सौदी अरेबिया, इराण, कुवेत, इराक, कतार, बहारीन आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांतील कच्चे तेल आणि वायू वाहून नेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. जगातील जवळपास 20 टक्के कच्च्या तेलाचा व्यापार याच मार्गाने होतो. भारतात येणाऱ्या बहुतांश इंधनाचा प्रवासदेखील या खाडीमार्गेच होतो. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास भारताच्या इंधन सुरक्षेला जबरदस्त धक्का बसू शकतो.
या खाडीचा व्यापारासाठी बंद होण्याचा निर्णय फक्त इंधन पुरवठ्यावरच नव्हे, तर जागतिक बाजारपेठांवरही गंभीर परिणाम करू शकतो. तेलाच्या किमती वाढण्याची आणि महागाईच्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते.
दरम्यान, इराणच्या अणुऊर्जा संस्थेने अमेरिकेच्या हल्ल्याची कबुली दिली असली, तरी त्यांचा अणू कार्यक्रम थांबणार नाही, असे स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रांची अणुऊर्जा एजन्सीही किरणोत्सर्गाचे पुरावे मिळाल्याचे नाकारते. युद्धाच्या या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर होर्मुझ खाडीच्या नाकाबंदीची शक्यता अधिकच भयावह ठरत असून, आंतरराष्ट्रीय नेत्यांनी चर्चेच्या माध्यमातून तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. पण सद्यस्थितीत तणाव निवळण्याची शक्यता कमीच असल्याचे स्पष्ट होते.