Israel-Hamas : "गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा"; नेतान्याहूंचा आदेश
थोडक्यात
‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’
नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!
नव्या आदेशानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी तणावग्रस्त
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी इस्रायली लष्कराला गाझा पट्टीवर पूर्ण ताकदीने आणि तत्काळ हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायलकडून करण्यात आला असून, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमास यांच्यात काही दिवसांपूर्वी युद्धबंदी करार झाला होता. मात्र, इस्रायलने दावा केला की दक्षिण गाझामध्ये हमासकडून त्यांच्या सैन्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर नेतान्याहूंनी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लष्कराला गाझा पट्टीतील लक्ष्यांवर शक्तिशाली आणि तातडीने हल्ले करण्याचे निर्देश दिले.
नेतन्याहूंच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “सुरक्षेबाबत सल्लामसलत केल्यानंतर पंतप्रधानांनी गाझामधील लक्ष्यांवर त्वरित आणि शक्तिशाली कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.”
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करारानुसार हमासने २८ ओलिसांचे मृतदेह इस्रायलला परत करायचे होते. मात्र, सोमवारी रात्री हमासकडून एका मृतदेहाचे अवशेष इस्रायलला सुपूर्द करण्यात आले. इस्रायलच्या फॉरेन्सिक तपासणीत हे अवशेष त्या व्यक्तीचेच असल्याचे आढळले, ज्याचा मृतदेह इस्रायलला यापूर्वीच परत करण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलने याला कराराचे स्पष्ट उल्लंघन ठरवत संतप्त प्रतिक्रिया दिली.
दुसरीकडे, हमासने इस्रायलचे आरोप फेटाळले असून, युद्धबंदी कराराचे उल्लंघन इस्रायलनेच केल्याचा दावा केला आहे. हमासच्या लष्करी शाखेने म्हटले आहे की इस्रायलकडून सुरू असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे आणि करारातील अटींचे उल्लंघन झाल्याने त्यांनी ओलिसांचे मृतदेह परत देण्याची प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
या घटनांमुळे पुन्हा एकदा इस्रायल-हमास संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गाझा परिसरात लष्करी हालचालींना वेग आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमेरिकेने आणि संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही बाजूंना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे, मात्र इस्रायलने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका घेतली आहे. युद्धबंदीच्या प्रयत्नांनंतरही इस्रायल आणि हमासमधील संघर्ष संपलेला नाही. नेतान्याहूंच्या नव्या आदेशानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी तणावग्रस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
