Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला
इस्रायली लष्कराने सीरियाच्या राजधानी दमास्कसमधील सरकारी लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला आहे. दक्षिण सीरियामधील ड्रूज वर्चस्व असलेल्या भागात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात मृतांचा आकडा 200 च्या पुढे गेला आहे, अशी माहिती युद्ध निरीक्षण संस्थांकडून मिळत आहे.
इस्रायलने बुधवारी अधिकृत निवेदनात सांगितले की, त्यांनी सीरियन लष्करी हालचालींवर लक्ष ठेवले असून, त्यांच्या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केला. स्वीडा प्रांतात मंगळवारी तात्पुरता युद्धविराम लागू झाला होता, मात्र बुधवारी पुन्हा संघर्ष पेटल्याचे सीरियन प्रशासन आणि स्वतंत्र युद्ध निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
या संघर्षाची सुरुवात रविवारी झाली. एका बेडू इन जमातीच्या सदस्याने महामार्गावरून जात असलेल्या एका ड्रूज व्यक्तीवर हल्ला केला, यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. ड्रूज आणि बेडू इन गटांमध्ये परस्पर हल्ले आणि अपहरणाच्या घटनांनी वातावरण अधिक चिघळले. यातील काही बेडू इन गट सरकारच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे.
या वाढत्या तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सीरियन लष्कराने सोमवारी या भागात आपली उपस्थिती दाखवली. मात्र ड्रूज गटांना नव्या सरकारवर विश्वास नसल्यामुळे त्यांनी सरकारी सैन्यालाही शत्रूसमान मानत थेट संघर्ष सुरू केला.
बुधवारी स्वीडा शहरात पुन्हा चकमकी झाल्या. सीरियन संरक्षण मंत्रालयानुसार, शहरात काही बेकायदेशीर गटांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल सैन्याने गोळीबार केला. त्याच दिवशी इस्रायली हवाई हल्ल्याचे वृत्त देखील समोर आले, परंतु इस्रायली लष्कराकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
चार दिवसांत 200 हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती ‘सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स’ या संस्थेने दिली आहे. तसेच स्वीडा शहरात इंटरनेट आणि वीज सेवा खंडित झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.ड्रज समुदाय हा सीरियातील एक धार्मिक अल्पसंख्याक असून, एकूण लोकसंख्येच्या सुमारे 3 टक्के आहे. दीर्घकाळ चाललेल्या यादवी संघर्षात त्यांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र लष्करी संघटनांची उभारणी केली होती. या गटांनी असद सरकार तसेच अतिरेकी इस्लामी गटांचा सामना केला होता.
आजही स्वीडा प्रांतात ड्रूज गटांचे वर्चस्व आहे. हा भाग सीरियाच्या दक्षिणेस असून जॉर्डन व इस्रायलच्या सीमेवर आहे. असद शासनाच्या समाप्तीनंतर देशात आलेल्या नव्या सुन्नी नेतृत्वाने या गटांशी संवाद सुरू केला आहे, आणि त्यांना राष्ट्रीय लष्करात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापी, ड्रूज नेत्यांना नव्या राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा यांच्यावर विश्वास नाही. शरा यांचे पूर्वीचे संबंध एका अल-कायदाशी संलग्न गटाशी असल्याने, विविध धार्मिक आणि जातीय समूहांचे हित जपले जाईल का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.