बिहारच्या राजकारणात मोठी घडमोड? लालूंची ऑफर, नितीश कुमारांचं उत्तर

बिहारच्या राजकारणात मोठी घडमोड? लालूंची ऑफर, नितीश कुमारांचं उत्तर

बिहारच्या राजकारणात मोठी घडमोड होण्याची शक्यता आहे. लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना सोबत येण्याची ऑफर दिली, नितीश कुमार यांची प्रतिक्रिया काय आहे?
Published by :
shweta walge
Published on

बिहारमध्ये यावर्षाच्या उत्तरार्धात विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र त्यापूर्वीच बिहारमधील राजकारणात मोठी घडमोड घडणार असल्याची शक्यता आहे. कारण बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यांच्या सोबत येण्याची ऑफर दिली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये लालू प्रसाद यादव यांनी सांगितले की, नितीश कुमार हे आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. आम्ही नितीश कुमार यांना माफ केलं आहे. दरम्यान, लालू प्रसाद यांच्या या विधानावर आता नितीश कुमार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

नितीश कुमार म्हणाले, "ते काय बोलत आहेत? सोडून द्या", एवढंच त्रोटक विधान केलं. लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या विधानावर नितीश कुमार यांनी याहून अधिक प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, गेले काही दिवस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपशी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते मोठा निर्णय घेऊ शकतात असे बोलले जात आहे.

नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणार या प्रश्नावर काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते की, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा भाजपच्या संसदीय समितीकडे आणि नितीशकुमार यांच्या जेदयु पक्षाकडे असून आम्ही सर्व पक्ष मिळून निर्णय घेऊ." या वक्तव्यानंतर बिहारमध्ये एनडीएमध्ये आलबेल नसल्याचे समोर येत आहे.

लालू प्रसाद यादव यांनी ऑफर दिल्यानंतर राज्यपालांच्या शपथविधी समारंभात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भेट झाली. त्यावेळी राजद नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना यांना वंदन केले, तर नितीश यांनी आशीर्वाद दिले. या भेटीचे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com