Bengaluru Raid: अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्राची बंगळुरुमध्ये धडक कारवाई, 55 कोटी 88 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थांची विक्री,पुरवठा आणि वितरण यामध्ये गुंतलेल्या व्यक्तीवर प्रभावी फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्यची स्थापना केलेली आहे.सध्या महाराष्ट्रात 7 ठिकाणी विभागीय कृती कार्यालये स्थापन झालेली असून अंमली पदार्थ तस्करी विरोधी कारवाया सुरू आहेत.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्रचे कोकण पथकाने दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई वाशी गावातील पुणे मुंबई महामार्ग नजीकचे जुन्या बस डेपो येथे आरोपी अब्दुल कादर रशीद शेख याचेकडून 1 कोटी 48 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 1 किलो 488 ग्रॅम एमडी ड्रग्ज छापा कारवाईत जप्त केलेले होते.या घटनेबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाशी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात आरोपी अब्दुल कादर रशीद शेख याचेकडे केलेला तपास तसेच तांत्रिक विश्लेषणातून बेळगाव येथे राहणारा व एमडी ड्रग्ज बनवणारा प्रशांत यल्लापा पाटील याचे नाव निष्पन्न झाले.प्रशांत पाटील याचे तपासातून एमडी ड्रग्ज बंगळूर येथील 3 कारखान्यात बनवले जात असल्याचे निष्पन्न झाले.पोलीस पथकाने बंगळूर येथे पोहचत राजस्थानात कायमचे वास्तव्य असणारे परंतु बंगळूर शहरात एमडी ड्रग्ज अवैध व्यवसाय करणारे सुरज रमेश यादव व मालखान रामलाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल करत बंगळूर शहरातील स्पंदना लेआउट कॉलनी,एनजी गोलाहळी भागात आर जे इव्हेंट नावाचे फॅक्टरी तसेच येरपनाहळी कन्नूर येथील लोक वस्ती मधील एका आरसीसी घरामध्ये एम डी ड्रग्ज तयार करण्याचे कारखाने दाखवले.
या तिन्ही ठिकाणी धडकपणे पोलिसांनी छापा टाकून 4 किलो 100 ग्रॅम एमडी तसेच द्रव स्वरूपातील 17 किलो एमडी असे एकूण 21 किलो 400 ग्रॅम एमडी ,एमडी तयार करण्याचे यंत्रसामुग्री आणि विविध रसायने असा एकूण 55 कोटी 88 लाख 90 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करून या तिन्ही ठिकाणचे एम डी ड्रग्जचे कारखाने नष्ट करणेत आले आहेत.कर्नाटकातील बंगळूर येथील लोक वस्तीत एमडी ड्रग्ज बनवले जात होते.या तीन कारखान्यात बनवलेले एमडी भारतातील अनेक राज्यांमध्ये वितरित केले जात होते.एमडी ड्रग्जचे विक्रीतून बंगळूर शहरात यातील आरोपींनी मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेले आहे.आतापर्यंत या गुन्ह्यात 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.या गुन्ह्यातील महत्त्वाचे 2 आरोपींचे अटकेसाठी पथके प्रयत्नशील आहेत.
ही कारवाई श्री.सुनील रामानंद,अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे,श्रीमती शारदा राऊत,विशेष पोलीस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र, श्री,प्रवीणकुमार पाटील पोलीस उप महानिरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पुणे कृती गटाचे पोलीस अधीक्षक श्री.एम.एम मकानदार,अपर पोलीस अधीक्षक श्री.कृष्णात पिंगळे,कोकण कृती गटाचे पोलीस उपाधीक्षक श्री.रामचंद्र मोहिते,पोलीस निरीक्षक श्री.संतोष गावशेते,पोलीस निरीक्षक श्री.निलेश बोधे,सहायक पोलीस निरीक्षक श्री.उदय काळे,श्री.माधवानंद धोत्रे,उमेश भोसले,पोलीस उपनिरीक्षक श्री.संजय आदलिंग,श्री.सुहास तावडे,सहायक फौजदार श्री.अनिल पास्ते,श्री.अशोक आटोळे,पोलीस हवालदार श्री.महेश गवळी,श्री.जितेंद्र चव्हाण,श्री.योगीराज इंगुळकर,श्री.अनिल मोरे,श्री. जितेंद्र तुपे,श्री.शिवाजी रावते,श्री.अर्जुन बंदरे,पोलीस शिपाई श्री.मनीष भोईर इत्यादींनी कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे जाऊन अत्यंत मेहनतीने आणि कौशल्यपूर्वक एमडी ड्रग्ज जप्त करून बंगळूर शहरातील एमडी बनवणारे तीन कारखाने नष्ट केले आहेत.
