Telangana : तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 26 जखमी
(Telangana) तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी औषधनिर्मिती करणाऱ्या सिगाची फार्मा कंपनीत भीषण स्फोट झाला. पाशमायलाराम औद्योगिक क्षेत्रातील या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 26 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका मोठा होता की, तीन मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अनेक तुकड्या दाखल झाल्या आहेत.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत तातडीची मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ड्रायिंग युनिटमध्ये दाब वाढल्यामुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे. पोलीसांकडून या अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.