Pahalgam Terror Attack : 'माझ्या वडिलांना धर्म विचारला अन् गोळ्या मारल्या...'; पुण्याची आसावरी जगदाळेने सांगितली डोळ्यांदेखत घडलेली घटना

Pahalgam Terror Attack : 'माझ्या वडिलांना धर्म विचारला अन् गोळ्या मारल्या...'; पुण्याची आसावरी जगदाळेने सांगितली डोळ्यांदेखत घडलेली घटना

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 26 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना दहशतवादी असल्याचा अंदाज आला नाही.

या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे हे आपल्या पत्नी आणि मुलीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. या घटनेनंतर संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिने एका माध्यमाशी बोलताना त्याठिकाणी घडलेला प्रसंग सांगितला की, आमच्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना आणि माझ्या काकांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या.

त्या ठिकाणी मिनी स्वित्झर्लंड नावाची जागा आहे, पर्यटकांची त्याठिकाणी गर्दी असते. आम्ही सर्वजण त्याठिकाणी घोड्यावरून गेलो होतो आणि अचानक त्याठिकाणी गोळीबार झाला. पोलिसांच्या वेशात काही लोक आले होते. त्यांनी माझ्या वडिलांना विचारले की, तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम? तसेच त्यांना अजान देखील म्हणायला लावली. आम्ही स्त्रियांना काही करणार नाही पण तरीही आमची तुम्ही बदनामी केलीये. आमच्या धर्माला तुम्ही नावे ठेवता. असे म्हणत त्यांनी माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या.

यासोबतच ती पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी पोलिसांची गरज आहे त्याठिकाणी पोलीसच नाही आणि लष्करी जवान पण नाही आहे. जिथे गरज नाही तिकडे पोलीस उभे आहेत. हिंदू-मुस्लिम धर्मातील काही मित्र मैत्रीणी असतात. पण अशा घटनांमुळे त्यांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागतो. असे आसावरी म्हणाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com