Vladimir Putin : "भारत कोणासमोरही झुकणार नाही..."; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताबद्दल म्हणाले...
थोडक्यात
भारत कोणासमोरही झुकणार नाही-पुतिन
अमेरिकेचे शुल्क कुचकामी-पुतीन
पुतिन यांची ट्रम्पवर टीका
(Vladimir Putin ) रशिया-युक्रेन युद्धावरून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावात गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला. “भारत कोणासमोरही झुकणार नाही, अमेरिकेचे शुल्क कुचकामी ठरणार आहेत,” असे ठाम विधान पुतिन यांनी केले.
युक्रेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने अनेक प्रयत्न केले होते, मात्र ते निष्फळ ठरले, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे. स्वतः ट्रम्प यांनीही कबूल केले की त्यांनी पुतिन यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. उलट त्यांनी युक्रेनला मदत करण्याचे संकेत दिले असून या मदतीमुळे युद्ध आणखी तीव्र होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेने भारत आणि चीनवर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. यामागे रशियाकडून भारत आणि चीनकडून तेल खरेदी सुरू असल्याचे कारण सांगितले जाते. परंतु पुतिन यांनी हा मुद्दा फेटाळून लावला. भारत आणि चीन हे स्वाभिमानी राष्ट्र आहेत आणि त्यांचे निर्णय त्यांच्या नागरिकांच्या हितासाठी असतात, असे पुतिन यांनी स्पष्ट केले.
नाटोवरही त्यांनी टीका केली. रशियाविरोधात भीती निर्माण करण्यासाठी नाटो नाटके करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र रशिया कोणत्याही देशावर हल्ला करण्याच्या विचारात नाही, पण जर कुणी प्रत्यक्ष चिथावणी दिली तर प्रत्युत्तर कठोर असेल, असा इशाराही पुतिन यांनी दिला.या वक्तव्यामुळे अमेरिका-रशिया तणावात आणखी वाढ झाली असून युरोप-नाटो आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकच गुंतागुंतीचे झाले आहेत.