Saamana : India Pakistan Ceasefire : 'ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात? नक्की काय सौदा झाला?'
(Pahalgam Attack) जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेले ऑपरेशन सिंदूर ( Operation Sindoor ) सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले जे भारताच्या सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ला चढवला. मात्र, भारताने याला देखील चोख प्रत्युत्तर दिले.
भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan ) तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे शनिवारी संध्याकाळी युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र, पुन्हा पाकिस्तानकडून युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. याच पार्श्वभूमीवर आता सामनातून प्रतिक्रिया दिली आहे. सामनातून म्हटले की, भारत हे एक सार्वभौम आणि स्वतंत्र राष्ट्र आहे. आमच्या राष्ट्रात कोणत्याही बाहेरच्या राष्ट्रास हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, पण अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांनी भारत-पाक संघर्षात हस्तक्षेप केला असून भारताने ट्रम्प यांचा युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य केला. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर भारताने युद्धविराम स्वीकारल्याचे परस्पर जाहीर केले. तोपर्यंत भारतवासीयांना आणि भारतीय सैन्यदलास या शस्त्रसंधीची माहिती नव्हती. प्रे. ट्रम्प यांना हे सरपंचाचे अधिकार दिले कोणी? 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर दोन राष्ट्रांत जो सिमला करार झाला त्यानुसार दोन राष्ट्रांच्या संघर्षात तिसऱया राष्ट्राने परस्पर घुसून हस्तक्षेप करण्याची परवानगी नव्हती. मात्र आता भारताच्या पंतप्रधानांनीच सिमला कराराचे उल्लंघन केले. भारताने ट्रम्प यांच्या दबावास बळी पडून शस्त्रसंधीस मान्यता दिली, पण ‘ऑपरेशन सिंदूर’ किंवा पाकिस्तानचा बदला पूर्ण झाला काय? याचे उत्तर देशाला मिळाले नाही. पाकिस्तान जागच्या जागी ठणठणीत उभे आहे व पाकड्या पंतप्रधानांनी ‘युद्ध आम्हीच जिंकलो’ अशी वल्गना करून पहलगाम हल्ल्यात सिंदूर उजाड झालेल्या 26 भगिनींच्या जखमेवर मीठ चोळले. हे सर्व घडत असताना पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री कोठेच दिसत नाहीत. युद्ध सुरू होण्यापूर्वी संसदेत गृहमंत्री अमित शहा गरजले होते की, पाकव्याप्त कश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यासाठी प्राणही देऊ, पण हे कश्मीर घेण्यासाठी भारताचे सैन्य पुढे सरकले तेव्हा मोदी-शहांनी सरळ शस्त्रसंधी स्वीकारली व प्रे. ट्रम्पपुढे शरणागती पत्करली. पाकबरोबरच्या संघर्षात कालपर्यंत सात जवानांचे बलिदान झाले ते व्यर्थ गेले काय? पाकच्या हल्ल्यात पूंछ-राजौरीत 12 निरपराध नागरिक मारले गेले. त्यांची काय चूक होती? पाकिस्तानबरोबरच्या युद्धास तोंड फुटले व आता माघार नाही असा पंतप्रधान मोदींचा आवेश होता. मोदींच्या आवेशामुळे देशात व सैन्यात नवी ऊर्जा निर्माण होत असतानाच प्रे. ट्रम्प यांनी पाचर मारली. पाकच्या हल्ल्यात भारताच्या सात जवानांना वीरमरण आले. त्यातील एक मुंबईतील मुरली नाईक हे आहेत व या तरुण हुतात्म्याचे वय फक्त 23 वर्षे आहे. उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारास उत्तर देताना मुरली नाईक आणि दिनेश शर्मा यांना वीरमरण आले. दिनेश शर्मा हेसुद्धा तरुण सैनिक. त्यांनी पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी दोन हात केले. देशासाठी अतुलनीय शौर्य गाजवले व भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान केले.
भारतीय सीमेवर असे हजारो दिनेश शर्मा, मुरली नाईक लढत आहेत व छातीवर गोळय़ा झेलत आहेत. मुरली नाईक यांचे आई-वडील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहतात. ते कष्ट करून घरसंसार चालवतात. एकुलता एक मुलगा भारतमातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढताना हुतात्मा झाला. ‘माझा मुलगा देशाच्या कामी आला याचा गर्व आहे’ असे मुरली यांच्या वडिलांनी सांगितले, पण शेवटी पोटचा गोळा गेल्याचे दुःख तर होणारच. ज्यांना युद्धाचा राजकीय उन्माद चढला आहे त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. जे युद्धाच्या राजकीय उन्मादाने बेभान झाले आहेत, त्यांनी देशासाठी ना कधी त्याग केला, ना चार आण्याचे शौर्य गाजवले, पण जणू काही हे युद्ध भारतीय जनता पक्ष व त्यांचेच लोक लढत आहेत असा प्रचार सुरू आहे. हा प्रचार खोटा ठरवणाऱ्या ‘द वायर’, ‘4 पीएम’सारख्या वृत्तसंस्था सरकारने बंद केल्या. ‘पुण्यप्रसून’ वाजपेयी यांचे चॅनलही बंद केले. गोदी मीडियाच्या उन्मादास मुक्त रान मिळावे म्हणून सत्य सांगणाऱ्यांचे गळे युद्धकाळात आवळले व आता आपल्या सार्वभौमत्वाचे सत्त्वच गमावून बसले. शस्त्रसंधीचा खेळ सुरू झाल्यावरही संरक्षणमंत्री ‘ऑपरेशन सिंदूरची’ ‘री’ ओढत आहेत. तरी मूळ प्रश्न आजही कायम आहेत ते म्हणजे ते सहा दहशतवादी आले कसे व गायब झाले कसे? त्यांचा ठावठिकाणा का लागला नाही? हे प्रश्न विचारले जाणारच.
जम्मूमधील सांबा सेक्टरमधून गुरुवारी मध्यरात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या सात दहशतवाद्यांना सीमा सुरक्षा दलाच्या बहादूर जवानांनी कंठस्नान घातले. याच जवानांनी पाकिस्तानी सीमेवरील चौकी उद्ध्वस्त केली. हे कौतुकास्पद आहे व प्रत्येक भारतीय नागरिकाला त्या कारवाईचा अभिमानच वाटावा. जर भारतीय सीमेवर जैशच्या सात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखून त्यांना कंठस्नान घातले जाते. मग पहलगामच्या पर्यटनस्थळावर घुसून अंदाधुंद हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कसे घुसू दिले? कसे मोकाट सोडले? त्यांना 26 भगिनींचा सिंदूर कसा पुसू दिला व हे केल्यावर त्यांचे पुढे काय झाले? हे प्रश्न निर्माण होतातच. ते प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरवून वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या व वृत्तसंस्थांचा गळा घोटणे हे लोकशाहीतील दहशतवादी कृत्यच मानायला हवे. भारतीय सेना, हवाई दल यांनी पाकिस्तानने भारतावर सोडलेले ड्रोन, क्षेपणास्त्र नाकाम केले. पाकड्यंना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र हे सर्व करत असताना पहलगाम हल्ला घडवून आणणारे ते सहा दहशतवादी नक्की कोठे गेले याचा शोध लागू शकलेला नाही. भारत-पाक युद्धाची ठिणगी त्याच सहा दहशतवाद्यांनी टाकली व भडका उडाला, पण पेटलेल्या होळीवर प्रे. ट्रम्प यांनी पाणी टाकले व त्या होळीच्या बोंबा सरकार मारत आहे. प्रे. ट्रम्प यांना भारत-पाकमध्ये शांतता नांदावी असे वाटते. प्रे. ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला नाहीत. ते एक व्यापारी आहेत. भारतातील सत्ताधारी व्यापाऱ्यांनी अमेरिकेच्या व्यापारी राष्ट्राध्यक्षांशी हातमिळवणी केली. प्रे. ट्रम्प यांनी इस्रायल-पॅलेस्टाईनचे युद्ध थांबवले नाही. तेथे सरळ इस्रायलला पाठिंबा देऊन ते ‘गाझा’तील जनतेचे शिरकाण पाहत बसतात आणि भारताला मात्र शांतीचा उपदेश देतात. प्रे. ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात? नक्की काय सौदा झाला? देशाला कळायलाच हवे! असे सामनातून म्हटले आहे.