US Shutdown
US Shutdown

US Shutdown : अमेरिकेत शटडाउनचं संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद

अख्खी अमेरिका ठप्प, सरकारी कामकाज थांबलं
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • अमेरिकेत शटडाऊन, पहिल्याच दिवशी संकट

  • देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद

  • अख्खी अमेरिका ठप्प, सरकारी कामकाज थांबलं

(US Government Shutdown) अमेरिकेतील फेडरल सरकार बंद झाल्याच्या पहिल्याच दिवशी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या शटडाउनचा परिणाम म्हणून पेनसिल्व्हेनियातील लिबर्टी बेल पासून हवाईतील पर्ल हार्बरपर्यंतची प्रमुख पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्यात आली.

ट्रम्प प्रशासनाने उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पत्रकार परिषदेत उपस्थित करून डेमोक्रॅट्सवर सरकारी निधी अडवण्याचा आरोप केला. प्रशासनाचे म्हणणे आहे की, डेमोक्रॅट्स बेकायदेशीर स्थलांतरितांना आरोग्यसेवा पुरविण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे डेमोक्रॅट्सनी स्पष्ट केले की, त्यांचा उद्देश अफोर्डेबल केअर अ‍ॅक्ट अंतर्गत आरोग्य अनुदानाचा कालावधी वाढवणे आहे, जेणेकरून सामान्य अमेरिकन कुटुंबांचे विमा हप्ते वाढणार नाहीत.

दोन्ही पक्षांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने या बंदचा आर्थिक परिणाम आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. अंदाजे 7.5 लाख फेडरल कर्मचारी कामावरून दूर ठेवले जाणार असून काहींच्या नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात. अनेक सरकारी कार्यालयांना शटर लावावे लागले असून काही कायमचे बंद होण्याची भीती आहे.

व्हाइट हाऊसकडून डेमोक्रॅट्सविरोधी संदेश अधिकृत संकेतस्थळे व दूरध्वनी सेवांवर प्रसारित करण्यात आले. विरोधकांचा उपहास करणारे मीम्स देखील दाखवले गेले, ज्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले.देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. अख्खी अमेरिका ठप्प झाली असून सरकारी कामकाज थांबलं आहे.

सिनेट डेमोक्रॅटिक नेते चक शूमर यांनी ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका करत सांगितले की, “अमेरिकन जनतेला ते प्याद्यासारखे वापरत आहेत आणि देशाला त्रास देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.” या शटडाउनमुळे शिक्षण, पर्यावरण आणि इतर सार्वजनिक सेवांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. आधीच अस्थिर होत चाललेल्या रोजगार बाजारावर याचे दुष्परिणाम होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com