Sonam Wangchuk : "...तोपर्यंत मी तुरुंगातच राहणार"; सोनम वांगचुक यांनी कोठडीतून लिहिलं पत्र
(Sonam Wangchuk) लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून पत्र लिहिले आहे. ते पत्रात म्हणाले की, हिंसाचारात मृत्यू झालेल्या चार जणांच्या स्वतंत्र न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले की, “जोपर्यंत या मृत्यूंची निष्पक्ष चौकशी होत नाही, तोपर्यंत मी तुरुंगातच राहीन.” हे पत्र लेह एपेक्स बॉडी (LAB) चे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट मुस्तफा हाजी यांनी शेअर केले. वांगचुक यांनी पत्रात हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी तसेच अटक झालेल्यांसाठी प्रार्थना केली. त्यांनी लिहिले, “लडाखमध्ये शांतता आणि न्यायासाठी संघर्ष सुरूच राहील.”
24 सप्टेंबर रोजी लेहमधील हिंसाचारानंतर वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. ते सध्या जोधपूर कारागृहात असून त्यांच्या सुटकेसाठी दाखल हेबियस कॉर्पस याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर होईल.
पत्रात वांगचुक यांनी LAB आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यांनी म्हटले की, “लडाखला राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीत समावेश हा आमचा वैध हक्क आहे.” असे वांगचुक म्हणाले.