Sunita Williams : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार, अंतराळ प्रवासात नवा विक्रम
8 मार्चला सुनीता विल्यम्स यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची सूत्रं रशियन कॉस्मोनॉट अॅलेक्सी ओचिनीन यांच्याकडे सोपवली आहेत. सध्या ISS मध्ये असणारे स्पेस एक्सच्या क्रू 9 मिशनचे अंतराळवीर आता पृथ्वीवर परतणार आहेत आणि त्यांच्यासोबतच नासाचे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरही पृथ्वीवर परततील. स्पेसएक्स क्रू 10 मोहीम 12 मार्चला ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे स्पेस एक्सचा क्रू 10 म्हणजे अंतराळवीरांचं दहावं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावेल. नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून हा लाँच होईल.
गुरुवारी 13 मार्चला हे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉक होईल - म्हणजे हे यान अंतराळ स्थानकाला जोडलं जाईल आणि सध्या अंतराळ स्थानकात असणाऱ्या नवव्या पथकाची जागा ही नवी टीम घेईल. अंतराळ स्थानकातून अंतराळवीरांची ने-आण करण्यासाठी आता नासा स्पेस एक्स या इलॉन मस्क यांच्या खासगी अंतराळ कंपनीची यानं वापरतं आणि नासासाठीची ही स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टची 11 वी मानवी मोहीम आहे.
यानंतर हे यान अंतराळ स्थानकापासून विलग होईल आणि 16 ते 19 मार्चदरम्यान क्रू 9 मिशनच्या अंतराळवीरांसोबतच बोईंगच्या मोहीमेच्या अडकलेल्या दोन अंतराळवीरांनाही पृथ्वीवर परत घेऊन येईल. परतीच्या प्रवासात नासाचे अंतराळवीर निक हाग हे या यानाचे पायलट असतील आणि Undocking पासून ते Splashdown म्हणजे समुद्रात कॅप्सूल उतरवण्यापर्यंतची प्रक्रिया ते हाताळतील.
त्यांच्यासोबत सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि रशियन कॉस्मोनॉट अॅलेक्सांडर गॉर्बोनॉव्ह पृथ्वीवर या यानातून परततील. स्पेस एक्सच्या यानाने सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परततील तेव्हा आणखीन एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर होईल. नासाचं स्पेस शटल, सोयुझ यान, बोईंग स्टारलायनर आणि स्पेस एक्स क्रू ड्रॅगन अशा चार वेगवेगळ्या स्पेस कॅप्सूल्समधून अंतराळ प्रवास केलेल्या त्या पहिल्या अंतराळवीर ठरतील.