Donald Trump : स्मार्टफोन, लॅपटॉपसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय, टॅरिफमधून सूट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या धडकेबाज निर्णयांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे जगभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शेअर बाजार कोसळले, व्यापार युद्ध सुरू होण्याची भीतीदेखील व्यक्त केली जाऊ लागली. दरम्यान या टॅरीफच्या निर्णयामुळे अनेक देशांनी यावर नाराजी व्यक्त केली. अमेरिकेने चीनवर तब्बल 145 % टॅरीफ लादला. त्यानंतर चीनने या सगळ्या प्रत्युत्तर देत अमेरिकन उत्पादनांवर 125 % टॅरीफ लावला आहे.
चीनच्या या निर्णयावरुन आता अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला. स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर चिप्ससह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना टॅरिफमधून सूट दिली आहे. चीनवर लावण्यात येणाऱ्या 145 टॅरिफच्या किंवा इतरत्र लावण्यात येणाऱ्या 10 टक्के टॅरिफच्या अधीन राहणार नाही आशा सूचना देण्यात आल्या आहेत. या वस्तूंना टॅरिफमधून वगळल्याने अॅपल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, एनव्हीडियासारख्या बड्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या उत्पादनांवर टॅरीफ नाही ?
समोर आलेल्या माहितीनुसार, आयफोनचे 80 % उत्पादन हे चीनमध्ये होते. स्मार्टफोन, संगणक, डिस्क ड्राईव्ह, डेटा प्रोसेसिंग उकरणं, सेमींकडक्टर उपकरणं, मेमरी चिप्स, फ्लॅट पॅनल डिस्प्ले, टेलिकम्युनिकेशन उपकरणं, चिपमेकिंग मशीन, रेकॉर्डिंगची उपकरणं, प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली यांचीही प्रामुख्याने आयात चीनमधून केली जाते. ही उत्पादनं देशातच बनवण्याच्या सुविधा उभारण्यासाठी अमेरिकेला अनेक वर्ष जातील. त्यामुळे ही उत्पादनं टॅरिफमधून तात्पुरती वगळली असावी किंवा लवकरच यावर नवीन कर लागू केला जाऊ शकतो, असे शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.