Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत-चीनवर गंभीर आरोप, म्हणाले...
थोडक्यात
तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा भारत-चीनवर गंभीर आरोप
रशियाकडून तेल खरेदी करून हे दोन्ही देश युक्रेन युद्धाला आर्थिक मदत करत असल्याचा केला गंभीर आरोप
ट्रम्प यांनी यावेळी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याचा पुन्हा दावा केला
(Donald Trump )अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतल्या आपल्या भाषणात चीन आणि भारतावर थेट निशाणा साधला. रशियाकडून तेल खरेदी करून हे दोन्ही देश युक्रेन युद्धाला आर्थिक मदत करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “या खरेदीमुळे युद्ध अधिक भडकत आहे,” असे वक्तव्य करताना त्यांनी युरोपीय राष्ट्रांनाही रशियन उर्जेसंदर्भातील भूमिका बदलण्याची गरज असल्याचे बजावले.
ट्रम्प यांनी यावेळी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबवल्याचा दावा पुन्हा केला. तसेच आपल्या कार्यकाळात सात अशा युद्धांचा शेवट केल्याचे ते म्हणाले. हवामान बदलावर बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना “जगातील सर्वात मोठी फसवणूक” असे संबोधून पर्यावरणीय धोरणांवर विश्वास ठेवत नसल्याचे स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र संघावर हल्लाबोल करताना ट्रम्प यांनी हे संघटन केवळ कडक शब्दांत निवेदन करते, प्रत्यक्षात शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरते, असे म्हटले. “फक्त पत्रे लिहून युद्ध थांबत नाही,” असे ते म्हणाले. याशिवाय अवैध स्थलांतराला प्रोत्साहन देऊन पाश्चिमात्य देशांना संकटात ढकलल्याचा आरोप त्यांनी संयुक्त राष्ट्रांवर केला.
इस्रायल-गाझा संघर्ष आणि युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांत यश न आल्याची कबुली देतानाच ट्रम्प यांनी अमेरिकन मित्रदेशांवर टीका केली. हमासला मान्यता देऊन पॅलेस्टाइनला राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे ते म्हणाले. तसेच हमासने बंदिवानांना सोडल्याशिवाय शांततेचा मार्ग खुला होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.