Donald Trump : अमेरिकेचा भारताला पुन्हा एकदा धक्का; टॅरिफ वाढ घोषणेनंतर 'या' 6 भारतीय कंपन्यांवर लादले निर्बंध
(Donald Trump) भारतातील किमान सहा कंपन्यांवर अमेरिकेने कठोर कारवाई करत निर्बंध लादले असून यामागे इराणसोबत झालेल्या तेल व्यापाराचे कारण दिले गेले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात या कारवाईची घोषणा केली.
ही कारवाई इराणी पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्सशी संबंधित व्यापार करणाऱ्या जगभरातील 20 कंपन्यांच्या विरोधात करण्यात आली आहे. या कारवाईत भारतातील अल्केमिकल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड, ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड, रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी, पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि कांचन पॉलिमर्स या कंपन्यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या आरोपानुसार, या कंपन्यांनी इराणवर असलेल्या निर्बंधांचा भंग करत 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात इराणी पेट्रोलिअम उत्पादने आणि मिथेनॉलची खरेदी केली होती. या निर्णयानुसार संबंधित भारतीय कंपन्यांची अमेरिकेत असलेली सर्व मालमत्ता गोठवण्यात आली आहे. याशिवाय, अमेरिकन नागरिक किंवा कंपन्यांना या भारतीय कंपन्यांसोबत कोणताही व्यावसायिक व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने इराणकडून तेल खरेदी करणे कमी केलं आहे, विशेषतः 2019 नंतर अमेरिकेच्या दबावामुळे. मात्र, काही खासगी कंपन्यांकडून इराणसोबत व्यापार सुरूच होता, हेच अमेरिकेच्या कारवाईमागचे कारण असल्याचे समोर येत आहे. एकीकडे अमेरिका भारतावर 25 टक्के आयात कर लादण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानसोबत तेल करार करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.