Venezuela Crisis: निकोलस मादुरो यांना भयंकर शिक्षा; अमेरिकेच्या कुख्यात तुरुंगात डांबले, जगभर खळबळ
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक करून न्यूयॉर्कमधील कुख्यात तुरुंगात ठेवले आहे. अमेरिकेने केलेल्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या निर्णयावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हेनेझुएलातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला करत अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली.
सध्या निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात असून, त्यांच्यावर लवकरच खटला चालवण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला काही देशांनी विरोध दर्शवला आहे, तर काही देशांनी अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
न्यूयॉर्कच्या कुख्यात तुरुंगात मादुरो
मिळालेल्या माहितीनुसार निकोलस मादुरो यांना न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटर (MDC) या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हा तुरुंग अत्यंत खराब सुविधा, अमानवी वागणूक आणि असुरक्षिततेसाठी ओळखला जातो. या तुरुंगाला अनेक वेळा “पृथ्वीवरील नरक” असे संबोधले जाते. येथे कैद्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. काही न्यायाधीशांनी आरोपींना या तुरुंगात पाठवण्यास नकार दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
एका तुरुंगात हजारो कैदी
हा तुरुंग 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला बांधण्यात आला असून, सध्या येथे सुमारे 13 हजार कैदी ठेवण्यात आले आहेत. हा तुरुंग समुद्रकिनारी असलेल्या औद्योगिक परिसरात आहे. या तुरुंगाच्या आसपास शॉपिंग मॉल आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसारखी प्रसिद्ध ठिकाणेही आहेत. या तुरुंगात यापूर्वी प्रसिद्ध गायक आर. केली आणि अमेरिकन रॅपर शॉन ‘डिडी’ कॉम्ब्स यांनाही ठेवण्यात आले होते. 2024 मध्ये या तुरुंगात दोन कैद्यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. तसेच काही तुरुंग अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते.
मादुरो यांच्याबाबत चिंता वाढली
या पार्श्वभूमीवर आता निकोलस मादुरो यांच्यासोबत पुढे काय होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या या कठोर भूमिकेमुळे व्हेनेझुएला अमेरिका संबंध अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
