Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की सोमवारपासून वॉशिंग्टन दौऱ्यावर; डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट
(Volodymyr Zelenskyy ) वॉशिंग्टन डी.सी. येथे सोमवारी होणाऱ्या बैठकीत युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत. या चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे रशियासोबत चालू असलेला संघर्ष संपवण्यासाठी मार्ग शोधणे. मात्र यावेळी झेलेन्स्की एकटे नसून युरोपातील अनेक नेते तसेच नाटोचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. मागील अमेरिकावारीत झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या वादामुळे या बैठकीला अधिक संवेदनशील मानले जात आहे.
ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच अलास्कामध्ये ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत शिखर परिषद घेतली. या चर्चेदरम्यान पुतिन यांनी युद्धविरामासाठी युक्रेनने पूर्वेकडील डोनबास प्रदेश रशियाला द्यावा, अशी मागणी केली असल्याचे वृत्त समोर आले. मात्र झेलेन्स्की यांनी आपला भूभाग कुठल्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रविवारी झेलेन्स्की यांच्या अमेरिकावारीपूर्वी मॅक्रॉन आणि मर्झ यांनी फ्रान्सच्या नेतृत्वाखालील ‘कोअॅलिशन ऑफ द विलिंग’ ची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प–पुतिन चर्चेचा आढावा घेण्यात आला. स्टार्मर यांनी पुतिनला “त्यांचा अमानुष हल्ला त्वरित थांबवावा” असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की युरोपियन देश रशियावर आणखी कठोर निर्बंध लादणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या युद्धयंत्रणेवर गंभीर परिणाम होईल.
शनिवारी प्रसिद्ध झालेल्या ईयूच्या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, युक्रेनच्या सैन्यावर कोणतेही बंधन घालता येणार नाही आणि रशियाला युक्रेनच्या युरोपियन युनियन व नाटो प्रवेशावर व्हेटोचा अधिकार मिळणार नाही. “आंतरराष्ट्रीय सीमा शक्तीने बदलल्या जाऊ नयेत आणि युक्रेनलाच आपल्या भूभागाबाबत निर्णय घेण्याचा हक्क आहे,” असे निवेदनात नमूद केले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमधील ही बैठक केवळ युक्रेन-रशिया युद्धच नव्हे तर युरोप-अमेरिका संबंधांसाठीही निर्णायक ठरणार आहे.