Donald Trump: तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर थेट बी-2 बॉम्बर विमानांचं उड्डाण, ट्रम्प यांचा मोठा निर्णय
प्रशांत महासागरातील तणाव आता महाशक्ती देशांच्या थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तैवान विवाद आणि जपानशी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनने रशियाच्या मदतीने पूर्व चिन्हाई समुद्रात आक्रमक पेट्रोलिंग केले, तर प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने जपानच्या समर्थनार्थ आपले सर्वात घातक बी-2 बॉम्बर जेट मैदानात उतरवले आहे. सध्या अमेरिकेचे बी-2 बॉम्बर जपानच्या एफ-35 आणि एफ-15 सह एकूण १० फायटर जेट्ससह पूर्व चिन्हाई समुद्रात संयुक्त पेट्रोलिंग करत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे.
मंगळवारी चीन आणि रशियाच्या वायुदलाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संयुक्त एअर पेट्रोलिंग केली होती. रशियाचे टीयू-95 स्ट्रॅटेजिक मिसाईल वाहक बॉम्बर जेट्सनी चीनच्या एच-6 बॉम्बर्ससोबत ईस्ट चायना सी, जपान समुद्र आणि पश्चिम प्रशांत महासागरात टेहळणी केली. या कारवाईने जपानला भयभीत केले असता, अमेरिकेने तात्काळ प्रतिसाद देत जपानसोबत संयुक्त पेट्रोलिंग सुरू केले. रशियाने याला "आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन" असल्याचे सांगितले, मात्र जपान आणि दक्षिण कोरियाने कडा आक्षेप घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राधीक्षक डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला होता. युक्रेन-रशिया युद्धाला थांबवण्याची मागणी करताना त्यांनी म्हटले होते, "हे युद्ध थांबले नाही तर जग तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल. युक्रेन-रशियाला मदत करणाऱ्या सर्व देशांना हा इशारा!" ट्रम्पांच्या या विधानानंतर बी-2 बॉम्बरची तैनाती करून अमेरिकेने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढता तणाव आता जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरत आहे.
