Dhanteras 2024 Health Tips: धनत्रयोदशीच्या प्रसादातील धणे आणि लाह्यांचा आरोग्यदायी लाभ; जाणून घ्या...
डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
आरोग्यशाहीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या धनत्रयोदशीच्या मनापासून शुभेच्छा! धनत्रयोदशी ही धन्वंतरी जयंती म्हणूनही ओळखली जाते. आपल्या सर्वांच्या आरोग्याचं रक्षण करणाऱ्या, धन्वंतरी देवतेची जयंती, दीपावलीत अंतर्भूत असणं, हा केवळ योगायोग नाही तर ती ऋषीमुनींनी केलेली एक उत्तम योजना आहे. "आरोग्यम् धनसंपदा" हे संस्कृत वचन खूप काही सांगणारं आहे. धन म्हणजे पैसा, संपत्ती असं जरी आपण समजत असलो तरी या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी मुळात आरोग्य हे लागतंच. बँकेत लाखो रुपये जमवलेले असले तरी त्यामुळे आरोग्य विकत घेता येत नाही हे लक्षात आणून देणारा आजचा हा दिवस.
जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधनांची आजच्या दिवशी पूजा केली जाते. यात धन म्हणजे सोनं, पैसे हे प्रतिकात्मक रूपानी अंतर्भूत होतात. पण जीवन सुखानी जगण्यासाठी, सर्वात महत्त्वाचं साधन हे आपलं शरीर असतं, नाही का? त्यामुळे शरीररुपी साधनाची नीट काळजी घेणं, एखाद्या यंत्राचं जसं आपण वेळेवर कॅलिब्रेशन करतो तसं पंचकर्माच्या मदतीनी वेळेवर शरीरशुद्धीकरणं, अंगाला तेल लावणं, आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणं, हे सगळं लक्षात आणून देणारा आजचा हा दिवस.
धनत्रयोदशीला प्रसाद म्हणून धणे आणि लाह्या दाखवण्याची पद्धत आहे. या दोन्ही गोष्टी शरीरातील विषद्रव्य आणि उष्णता, मूत्र मार्गानीबाहेर काढून टाकण्यास मदत करणाऱ्या आहेत. त्यामुळे युराईन कमी प्रमाणात होत असेल, जळजळ होत असेल, युरिनेशनला जाऊन आल्यावरही मूत्राशय रिकामा झाल्यासारखं वाटत नसेल, तर अशा वेळेला, अर्धा चमचा थोडेसे कुटलेले धणे आणि दोन चमचे साळीच्या लाह्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात आणि सकाळी हे पाणी गाळून घेऊन प्यावं. पुन्हा एकदा आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. 2024 ची दीपावली आपल्या सर्वांना सुख-समृद्धी देणारी, आरोग्य देणारी ठरो, हीच, श्री धन्वंतरींच्या चरणी प्रार्थना.