Film Festival: ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख जाहीर
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दि. २८ जानेवारी ते रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा भव्य महोत्सव रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर आणि आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन यांच्या आयोजनात हा महोत्सव भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून प्रोझोन मॉलचे विशेष सहकार्य लाभले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाची सहप्रस्तुती असणार आहे. जागतिक दर्जाचे चित्रपट छत्रपती संभाजीनगरच्या रसिकांपर्यंत पोहोचवणे, युवा कलाकारांना व्यासपीठ देणे, मराठवाड्याला सांस्कृतिक केंद्र व प्रोडक्शन हब म्हणून ओळख करणे, स्थानिक पर्यटनाला चालना देणे, मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचवणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार, सुवर्ण कैलास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, भारतीय सिनेमा स्पर्धा, जागतिक सिनेमा विभाग, रेट्रोस्पेक्टीव्ह, ट्रिब्युट, मास्टर क्लास, विशेष व्याख्यान, स्पेशल स्क्रिनिंग, परिसंवाद व पोस्टर प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यासंदर्भातील तपशील लवकरच जाहीर केले जातील.
आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुकथनकर, चंद्रकांत कुलकर्णी, निमंत्रक नीलेश राऊत यांनी महाराष्ट्रातील सिनेरसिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
