Ashadhi Ekadashi Wari 2022 : माऊलीच्या जयघोषात चिंब झाला संदीप

Ashadhi Ekadashi Wari 2022 : माऊलीच्या जयघोषात चिंब झाला संदीप

'टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची' अशीच काहीशी अनुभूती मागील काही दिवसांपासून अभिनेता संदीप पाठक घेत आहे. देवाची आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं
Published by :
Shweta Chavan-Zagade

चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्वच माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी झालेला अभिनेता संदीप पाठक सध्या माऊलीच्या जयघोषात ब्रम्हरसात न्हाऊन गेला आहे. 'टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची' अशीच काहीशी अनुभूती मागील काही दिवसांपासून अभिनेता संदीप पाठक घेत आहे. देवाची आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं आणि अलंकापुरीहून वारकऱ्यांसोबत इंद्रायणी ते चंद्रभागा असा संदीपचाही प्रवास सुरू झाला.

कपाळाला गोपीचंदन टिळा, हातात भगवी पताका, डोक्यावर वारकरी टोपी आणि सदरा असा वेश धारण केलेला संदीप सध्या 'लावूनी मृदुंग स्मृती टाळ घोष सेवू ब्रम्हरस आवडीने...' असाच काहीसा अनुभव घेत आहे. या प्रवासात एकीकडे संदीपला बालवारकरी भेटत आहेत, तर दुसरीकडे नव्वदी गाठत आलेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा आशीर्वाद मिळत आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीत चालणाऱ्या महिला वारकरी संदीपच्या मुखावरून हात फिरवत प्रेम देत आहेत. 'माऊली, माऊली'च्या गजरात भक्तीमय झालेल्या वातावरणात संदीपही जणू माऊलीमय झाला आहे. कधी हातात टाळ घेऊन, कधी खांद्यावर वीणा घेऊन, तर कधी पखवाजवर थाप मारत पाऊस-पाण्याची पर्वा न करता संदीपही या आनंद सोहळ्यात चिंब न्हाऊन गेला आहे. इंदापुरमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा 'गोल रिंगण सोहळा'ही संदीपनं डोळ्यांत साठवून ठेवला. 'येळकोट येळकोट जय मल्हार' म्हणत जेजुरीमध्ये संदीपनं बेल भंडारा उधळला. इतकंच काय तर गोंधळ्यांचं वाद्यही वाजवलं.

या वाटेवर संदीपला त्याचे चाहते असलेल्या असंख्य वारकऱ्यांचं प्रेम मिळालं. बऱ्याच जणांनी संदीपचे चित्रपट आवर्जून पहात असल्याची प्रतिक्रिया दिली. वारकऱ्यांकडून मिळालेलं प्रेम पाहून भारावून गेलेला संदीप म्हणाला की, करोडपती माणसांनाही इतकं प्रेम मिळत नाही. एका फळ विक्रेत्यानं प्रेमानं दिलेली भेट संदीपनं विनम्रतापूर्वक स्वीकारली. दिवंगत अभिनेते सतीश तारे यांच्यानंतर तुमच्यासारखा नट पहिला नसल्याची प्रतिक्रिया त्या फळविक्रेत्यानं व्यक्त केली. तुमच्या रूपात इंडस्ट्रीला सच्चा कलाकार मिळाल्याची प्रतिक्रिया ऐकून संदीप खऱ्या अर्थानं धन्य झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com