Yogi Adityanath movie : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावरील सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत; 2 दिवसांत होणार निर्णय
( Yogi Adityanath movie) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित 'अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप या चित्रपटास प्रमाणपत्र न मिळाल्याने निर्माते थेट मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. त्यामध्ये सेन्सॉर बोर्डाने दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन आता 1 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.
हा चित्रपट ‘द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपट निर्मात्यांनी प्रमाणपत्रासाठी जवळपास एक महिना आधी अर्ज केला होता. मात्र सेन्सॉर बोर्डाकडून वेळेत कोणताही निर्णय न आल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, सेन्सॉर बोर्डाने उत्तर प्रदेश सरकारकडून "ना हरकत प्रमाणपत्र" (NOC) मागितले आहे, जो नियमात नाही.
न्यायालयाने यावर तीव्र प्रतिक्रिया देत सेन्सॉर बोर्डाला निर्णय घेण्यासाठी निर्धारित मुदतीची सूचना दिली. आता दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय होणार असल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.