Dharmendra Deol : बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ उर्फ धर्मेंद्र रुग्णालयात दाखल; “धर्मेंद्रजींची तब्येत..." प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर
बॉलीवूडचे ज्येष्ठ आणि चाहत्यांच्या मनातील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांना शुक्रवारी तब्येतीच्या कारणास्तव मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक चर्चा रंगल्या. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र पूर्णपणे ठीक असून केवळ नियमित आरोग्य तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कुटुंबातील जवळच्या सूत्राने सांगितलं की, “धर्मेंद्रजींची तब्येत उत्तम आहे. त्यांच्या वयानुसार काही नियमित तपासण्या बाकी होत्या, म्हणूनच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. काहीही गंभीर नाही, सर्व काही नियंत्रणात आहे.” या स्पष्टीकरणानंतर धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अलीकडेच धर्मेंद्र दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या आगामी चित्रपट ‘इक्कीस’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. या चित्रपटात ते अगस्त्य नंदा यांचे आजोबा साकारत आहेत. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धातील परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘इक्कीस’ डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असून चाहत्यांमध्ये त्याची उत्सुकता पाहायला मिळते.
धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर “गेट वेल सून धर्मेंद्रजी” असे हॅशटॅग ट्रेंड केले. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
७० आणि ८० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत वर्चस्व गाजवणारे धर्मेंद्र आजही तितकेच उत्साही आणि ऊर्जावान आहेत. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’, ‘धरम वीर’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अजरामर स्थान निर्माण केलं आहे. आजही ते सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांशी संवाद साधतात आणि त्यांच्या जीवनातील क्षण शेअर करतात.


