चित्रपटासाठी सेंसर बोर्डाने मागितली लाखोंची लाच; विशालचा गंभीर आरोप
तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा दावा विशालने केला आहे. आता याप्रकरणाची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतली आहे.
विशालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना विशालने कॅप्शनमध्ये लिहिले की, पडद्यावर भ्रष्टाचार दाखवणे ठीक आहे. पण वास्तविक जीवनात हे चुकीचे आहे विशेषत: सरकारी कार्यालयात आणि त्याहूनही अधिक चुकीचे सीबीएफसी मुंबई कार्यालयात. त्यामुळे मी हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत आहे. माझा कष्टाचा पैसा भ्रष्टाचारात वाया गेला म्हणून मला तुमच्याकडून आशा आहे. नेहमीप्रमाणेच सत्याचा विजय होईल, असे त्याने म्हंटले आहे.
विशालच्या या पोस्टची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेत तातडीने सीबीएफसीवर कारवाई केली आहे. या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विट केले की, अभिनेता विशालने उपस्थित केलेला सीबीएफसीमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा अत्यंत दुर्दैवी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला आजच मुंबईत चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे. आम्ही jsfilms.inb@nic.in वर CBFC द्वारे छळवणुकीच्या इतर कोणत्याही प्रकरणाची माहिती देण्यासाठी सर्वांना विनंती केली जाते, असे सांगितले आहे.
दरम्यान, विशालचा चित्रपट 'मार्क अँटनी' हा रविचंद्रन दिग्दर्शित सायन्स फिक्शन टाईम ट्रॅव्हल ड्रामा चित्रपट होता. हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये विशालसोबत एसजे सूर्या देखील दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

