मानवी भावनांना स्पर्श करणारा कोबाल्ट ब्लू

मानवी भावनांना स्पर्श करणारा कोबाल्ट ब्लू

प्रेम ही सवय आहे, सवय तुटते, आपण संपतो...
पाहण्या योग्य(3 / 5)

कल्याणी दीक्षित

दोन जीवांना एकरुप, एकजीव एका रंगात दंग करणारं प्रेम...त्याला ना देहाचं बंधन, ना वयाचं ना कुठलाही अनाठायी हट्ट

सचिन कुंडलकर यांच्या कोबाल्ट ब्लू या कांदबरीवर आधारीत कोबाल्ट ब्लू हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय...अतिशय लईत, कॅमेऱ्याचे सुबक कंगोरे आणि आपापली भूमिका ठसठशीत वठवणारे कलाकार या चित्रपटाची जमेची बाजू अर्थात कुंडलकरांची ताकदीची कादंबरी आणि दिग्दर्शन ही तितकचं महत्वाचं...

गोष्ट 1996 मध्ये आपलं मुळ सोडून दक्षिणी राज्यात स्थित झालेल्या दीक्षित या मराठी कुंटुंबाची...चाकोरीबद्ध, कडक शिस्त आणि परंपरेचे अव्याहत गाठोडं वाहणारं घरं...

पण याच घरातील तरुण तनय आणि त्याची बहीण अनुजा यांची ही गोष्ट...तरणाबांड भाडेकरू (प्रतीक) त्यांच्या घरात राहायला येतो आणि जाताना दोघांनाही त्यांच्या ध्येयाची दिशा देऊन जातो...अतिशय गोड, अभ्यासात हुशार, आणी आकर्षक असा तनय, त्याच्या वयातली कुणीही मुलगी त्याच्याकडे सहज ओढली जावी अशा तनयला मात्र STRONG प्रतिक आवडू लागतो...त्याच्या सहवासात आपण वेगळे आहोत हे त्याला ठामपणे जाणवू लागंत आणि सहवास हवाहवासा वाटू लागतो...

गोष्ट ज्या काळात घडतेय त्या काळात समलिंगी असणं, स्पष्टपणे सांगणं तसा गुन्हाच...आताही हे इतकं सहज नाहीच म्हणा...पण तो काळ खुपच कडवा...त्यावेळी तनयला प्रतिक भेटणं, दिवसेंदिवस नातं फुलतं जाणं, शारिरिक जवळीकता वाढणं आणि निसर्ग नियमाप्रमाणे आपसूकचं त्यांच्यात गोष्टी घडत जातात...

तनयच्या कॉलेजमधील एक शिक्षकही समलिंगी अर्थात 'गे' आहे.त्यालाही तनय आवडतो, पण ते अव्यक्त आहे, तनय कडूनही तसा प्रतिसाद नाही. गोष्टीला कलाटणी तेव्हा मिळते जेव्हा प्रतिक अचानक निघून जातो, आणि त्याचं एक वेगळं सत्य समोर उभं ठाकतं.तनय आतून कोलमडून जातो, शारीरीक आग आपल्या गे शिक्षकाकडून भागवतो पण ते तितकचं नाहीये काहीतरी आपल्यातलं दूर गेलंय याची जाणीव तनयला स्वस्थ बसू देत नाहीये.

त्यातच अनुजा आणि प्रतिकचे संबंध आतून सगळ काही हलवून टाकतात. अनुजा हरहुन्नरी, TOMBOY कॅटगिरी मधली जिला मुलींप्रमाणे नटणं, थटणं काही जमत नाही एका ठराविक वयात आल्यावर मुलींवर घरातून येणारी बंधनं झुगारणारी, मुक्त वावरणारी, अनुजा...

आपल्या शरिराशी अनभिज्ञ असणाऱ्या अनुजाला प्रतिकच्या माध्यमातून आपल्या शरीराशी झालेली नव्याने ओळख,अंगावरच्या काही भागावरचे केस मुलींनी काढलेच पाहिजेत असा हट्ट न धरता तिला जशी आहे तशी स्विकारणारा प्रतिक तिला जबरदस्त आवडतो.

पण आपण आणि आपली बहीण एकाच मुलासोबत शय्यासोबत केली, ज्याच्यावर विश्वास ठेवला तो वाऱ्यासारखा निघून गेला हे पचवणं तनयला अवघड जातं.मग तनय यातून कसा मार्ग काढतो, पुढे अनुजाचं काय होतं हे सगळं पाहावं असचं आहे.

अल्लड मुलगा, प्रेमात आकंठ बुडालेला, उद्धवस्त झालेला आणि नंतर त्यातून वेगळंच रसायन म्हणून समोर आलेला तनय...अतिशय मनाला भिडणारा असाचं...प्रत्येक फ्रेम मधला त्याचा वावर, सहजता उत्तम.अनुजा ची भूमिका वठवणारीही चौकटीबाहेरचीच, बाकी प्रतिक, तनयचा शिक्षक आणि बाकी कलाकारांचा अभिनयही साजेसा.

एका शांत, संथ आपल्याचं लईत जाणारा हा सिनेमा एखाद्या नदीसारखा भासतो...वरुन दिसणारी आणि आतून असणारी नदी भिन्न असते...हेच अधोरेखित करणारा हा सिनेमा...प्रत्येक खोल, उंचवट्यावर आपल्याला अलगद घेऊन जाणारी आणि मानवी भावनांना स्पर्शून जाणारा हा सिनेमा एकदा बघावा असाच.

मानवी भावनांना स्पर्श करणारा कोबाल्ट ब्लू
डॉ अमोल कोल्हे यांचा 'विठ्ठल विठ्ठला' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com