Potara Movie
Potara MovieTeam Lokshahi

सोलापूर दिग्दर्शकाचा चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात

शिरापूरचे युवा दिग्दर्शक शंकर धोत्रे यांची निर्मिती 'पोटरा' चा बहुमान
Published by :
Vikrant Shinde

सोलापूर|संजय पवार: शिरापूर (ता. मोहोळ) (Shirapur, Mohol) येथील युवा दिग्दर्शक शंकर धोत्रे यांच्या पोटरा चित्रपटाचे फ्रान्स येथील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) प्रदर्शन होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी शुक्रवारी मुंबई याबाबतची घोषणा केली.

'पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे कान्स (फ्रान्स) येथे 17 मे ते 28 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी सहभागी होतात.

या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम, महेंद्र तेरेदेसाई व दिलीप ठाकूर या ७ तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा", नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं" या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.

मंगळवेढा भागात झाले चित्रीकरण:

पोटरा चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात झाले आहे. या चित्रपटातून एका गरीब घरातील मुलीची व्यथा मांडण्यात आली आहे. सिनेमाची मुख्य अभिनेत्री छकुली देवकर ही मूळची आष्टी गावची आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या मरिआई वाले समाजातील एका मुलीला घेऊन शंकर धोत्रे यांनी हा सिनेमा साकारला आहे. या चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे आहेत. या चित्रपटाने पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोटराचे प्रदर्शन झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com