Star Pravah : स्टार प्रवाह वाहिनीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Star Pravah : स्टार प्रवाह वाहिनीने रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

ब्लॉकबस्टर ‘वेड’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली अनोख्या विक्रमाची नोंद
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

स्टार प्रवाह वाहिनीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लाखो प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्टार प्रवाह वाहिनीने हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली आहे. २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अनोखा विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली आहे. सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला. वेड सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या अनोख्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. वेड सिनेमात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस साठी सुद्धा छत्रीची निवड करण्यात आली. रितेश देशमुख यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वास नेला.

स्टार प्रवाहने वेड सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत अश्या शब्दात रितेश देशमुख यांनी भावना व्यक्त केली.

स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा २० ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत स्टार प्रवाह या अग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com