‘हर हर महादेव!’ राज ठाकरेंच्या आवाजात महागर्जना, ‘टीझर रिलीज

‘हर हर महादेव!’ राज ठाकरेंच्या आवाजात महागर्जना, ‘टीझर रिलीज

Published by :
Team Lokshahi

मराठी मनाला चेतवणारी, रक्त सळसळवणारी गर्जना म्हणजे हर हर महादेव… ! सह्याद्रीच्या कडेकपारातून , सिंधुदुर्गाच्या लाटांमधून, देवगिरीच्या अभेद्य भिंतीमधून ते अटकेपार फडकवणाऱ्या भगव्या ध्वजापर्यंत जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मराठा साम्राज्याची मोहोर उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणून सोडला आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक लढाईत ही गर्जना म्हणजे लढण्याचं बळ देणारी उर्जाच आहे. ह्या गर्जनेशिवाय मराठ्यांचा इचिहास पुर्ण होऊ शकत नाही. ही उर्जा आपल्याला परत 'हर हर महादेव' ('Har Har Mahadev') या चित्रपटातून अनुभवायला मिळणार असून हा चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित या चित्रपटाचा टीझर (Teaser) नुकताच प्रदर्शित केला आहे.

'हर हर महादेव' चित्रपटाला एक विशेष आवाज लाभलेला खास टिझर झी स्टुडिओजने आज प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या चित्रपटाच्या टीझरमधील धीरगंभीर आवाज हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आहे. या टीझरमध्ये आपल्याला राज ठाकरेंच्या आवाजामध्ये ही पुढील वाक्ये ऐकायला मिळणार आहेत. "जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही 350 वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव," झी स्टुडिओजच्या ( Zee Studios) माध्यमातून या चित्रपटाची ही झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे .

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com