Homebound : ईशान खट्टर-जान्हवी कपूरचा 'होमबाउंड' ऑस्करच्या शर्यतीत
थोडक्यात
ईशान खट्टर-जान्हवी कपूरचा 'होमबाउंड' ऑस्करच्या शर्यतीत
हा चित्रपट द न्यू यॉर्क टाइम्स मधील “Taking Amrit Home” या लेखावर आधारित
TIFF मध्ये या चित्रपटाला पीपल्स चॉइस अवॉर्डसाठी दुसऱ्या क्रमांकाचा गौरव
(Homebound) नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंड या हिंदी चित्रपटाची 2026 च्या ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत निवड झाली आहे. ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या सिनेमाचा प्रीमियर 2025 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'अन सर्टेन रिगार्ड' या विशेष विभागात झाला होता. त्यावेळी चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. त्यानंतर टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही होमबाउंड ने जोरदार छाप सोडली. TIFF मध्ये या चित्रपटाला पीपल्स चॉइस अवॉर्डसाठी दुसऱ्या क्रमांकाचा गौरव मिळाला.
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट द न्यू यॉर्क टाइम्स मधील “Taking Amrit Home” या लेखावर आधारित आहे. जातीय आणि धार्मिक विषमता, तसेच आयुष्य बदलण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दोन मित्रांची ही कथा आहे. लॉकडाऊन काळातील स्थलांतरित कामगारांचे वास्तवही यात दाखवण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा मोहम्मद शोएब (ईशान खट्टर) आणि चंदन कुमार (विशाल जेठवा) या दोन तरुणांभोवती फिरते, जे पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. मात्र, धर्म आणि जात त्यांच्या वाटेत अडथळे आणतात. सुधा भारती (जान्हवी कपूर) हे पात्र कथेत आशेचा किरण ठरतो. तिच्या कठीण परिस्थितीतही ती धाडसी स्वप्न पाहते आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडते.