'अबोल प्रीतीची अजब कहाणी'त मुख्य भूमिकेत झळकणार चिपळूणची कन्या
निसार शेख|चिपळूण: सोनी मराठी वाहिनीवर आजपासून अबोल प्रीतीची अजब कहाणी ही नवीन मालिका सुरू होत आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये चिपळूण शहरातील पेठमाप येथील जान्हवी शीतल प्रमोद तांबट ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
विशेष म्हणजे या मालिकेत जान्हवी तांबट दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. मधल्या काळात तिच्याकडे एकही काम नव्हतं. ऑनलाईन ऑडिशन देणे सुरू होतं. यातच तिला अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
अजिंक्य राऊत हा सध्याचा आघाडीचा अभिनेता असून त्याने यापूर्वी दोन सुपरहिट मालिका दिल्या आहेत. त्याच्यासोबत जान्हवी पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक अजय मयेकर यांनी छान पद्धतीने माझ्याकडून काम करून घेतले आहे, असे म्हणत जान्हवी तांबटने मयेकर तसेच सोनी मराठी यांनी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
सोनी मराठीने माझ्यासारख्या नवख्या कलाकारावर विश्वास ठेवला, या संधीचे मी नक्कीच सोने करीन, असे सांगताना काहीतरी वेगळं, हटके पाहण्याची संधी अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेतून सर्वांना मिळेल, या मालिकेला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही जान्हवी तांबट हिने केले आहे.